करमाळा तालुक्यातील ऊस गाळपाने घेतला वेग ; आजअखेर ४६१९८३ मे टन
करमाळा समाचार -संजय साखरे

करमाळा तालुक्यातील चार साखर कारखान्यांपैकी तीन साखर कारखाने या वर्षी चालू असून तिन्ही साखर कारखान्याच्या गाळपाने सध्या वेग घेतलेला दिसून येत आहे. गाळपाच्या बाबतीत विहाळ येथील भैरवनाथ शुगर ने आज अखेर १९५३०० मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे. तर करमाळा शहरालगत असलेल्या कमलाभवानी साखर कारखान्याने आज अखेर १८५१८३ मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे. तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असलेल्या मकाई सहकारी साखर कारखान्याने 81 हजार पाचशे मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे.

सर्व साखर कारखाने सध्या तरी जास्तीत जास्त साखर उतारा देणाऱ्या उसाची तोड करत असून त्यापासून जास्त साखर उत्पादन करून पुढील गाळप हंगामात जादा दर देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय माढा येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, श्रीपुर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखाना, हळगाव तालुका जामखेड येथील श्रीराम शुगर ,शेटफळगडे तालुका इंदापूर येथील बारामती अग्रो व राशीन तालुका कर्जत येथील अंबालिका शुगर या कारखान्याच्या ऊस तोड टोळ्या तालुक्यातील उसाची तोड करत आहेत.

करमाळा तालुक्यात यावर्षी अंदाजे 30 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त ऊस असून त्याचे वेळेत गाळप करण्याचे आव्हान साखर कारखान्यांपुढे आहे. यावर्षी पुरेशा प्रमाणात व समाधानकारक पाऊस झाला असल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे पुढील गाळप हंगाम सुद्धा दमदार राहण्याची शक्यता आहे. सध्या सर्व साखर कारखान्यांनी आडसाली ऊस गाळपास प्राधान्य दिले असून पूर्वहंगामी व खोडवा उसाला मोठ्या प्रमाणात तुरे येऊ लागले आहेत.
त्यामुळे उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे आपल्या उसाचे लवकर गाळप करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करू लागला आहे.