मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अन्यथा साहेबांच्या खुर्चीला बांधु
करमाळा समाचार
करमाळा शहरातील अनेक प्रमुख रस्त्यावरील चौकांमध्ये मोकाट जनावरांचा वावर असल्याचे आढळून येत आहे त्या मध्ये प्रामुख्याने बस स्थानक व गायकवाड चौकात जास्त प्रमाणात मोकाट जनावरे वाहतुकीस अडथळा करून भर रस्त्यात उभारलेली व बसलेली असतात. त्याचा त्रास वाहनधारकासह खेड्यापाड्यातून तसे शहरातून येणाऱ्या शाळकरी मुला मुलींना होताना दिसत आहे.

गायकवाड चौक हा शहरातील प्रमुख रहदारीचा व वर्दळीचा चौक आहे या चौकातून पुणे- मुंबई सह इतर लहान – मोठ्या शहराकडे खेड्यांकडे जाण्याचा मार्ग आहे त्यामुळे या चौकात शहरातील इतर चौका पेक्षा वाहतूक जास्त प्रमाणात असते त्याच प्रमाणे या चौकाच्या जवळच महात्मा गांधी हायस्कूल यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व इतर शाळा हायस्कूल असल्याने विद्यार्थी व वाहनधारकांची वर्दळ जास्त असते अशातच या चौकात मोकाट जनावरे व बेशिस्तपणे केलेली वाहनांची पार्किंग या मुळेे नागरिकांना विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच करमाळा बस स्थानकात रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे वास्तव्य करत असल्याने रात्रभर त्यांनी केलेल्या घाणीमुळे प्रवासी व विद्यार्थी स इतर लोकांना त्या घाणीच्या साम्राज्याला व दुर्गंधीला सामोरे जावं लागत आहे सध्या करमाळा शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य झालेले असून करमाळा नगरपालिका कारभार राम भरोसे चालू आहे लवकरात लवकर शहरातील रस्त्यावरील मोकाट जनावरे व बेशिस्त पार्किंगचा प्रश्न करमाळा नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी समन्वय साधून मार्ग काढावा अन्यथा 15 ऑगस्ट रोजी शहरातील मोकाट जनावरे पकडून करमाळा नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला बांधू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष हनुमंत- मांढरे पाटील यांनी दिला आहे