फ्रंटलाईन वर्कर म्हणून भुमिका पार पाडणाऱ्या शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांना महसूलच्या धर्तीवर वैद्यकीय सोयीसुविधा द्याव्यात
करमाळा समाचार
कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविणेसाठी शिक्षक कर्मचार्यांच्या सेवा अधिग्रहीत केलेल्या आहेत. मात्र शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षितता आणि मागण्यांबाबत सकारात्मक विचार होत नाही. अनेक शिक्षक व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तिंचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. यामुळे फ्रंटलाईन वर्कर म्हणून भुमिका पार पाडणाऱ्या शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांना महसूलच्या धर्तीवर वैद्यकीय सोयीसुविधा द्याव्यात अशी मागणी जगताप गटाचे युवानेते शंभुराजे जयवंतराव जगताप यांनी केली आहे .

याविषयी अधिक माहिती देताना जगताप यांनी सांगीतले कि, कोरोनोच्या या महामारीत कर्तव्यावर अनेक शिक्षक कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय कोरोना बाधित होऊनही प्रशासकीय यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सोयी सुविधा अथवा मदत मिळाली नाही. वेळेत उपचार न मिळाल्याने काही कर्मचाऱ्यांवर मृत्यू ओढावला.
याप्रकारची पुनरावृत्ती टाळून यापुढे तरी फ्रंटलाईन वर्कर म्हणून माझे गांव कोरोना मुक्त, लसीकरण मोहीम, चेकपोस्ट, माझे कुटुंब – माझी जबाबदारी सर्वेक्षण, विलगीकरण कक्ष आदी कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांना तातडीने वैद्यकीय सुविधा तसेच मदत मिळावी. कोवीड १९ च्या अनुषंगाने शिक्षक कर्मचारी अथवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कोरोना बाधीत झाल्यास डीसीएच / डीसीएचसी रुग्णालयांनी तातडीने बेड उपलब्ध करून द्यावे.

फ्रंटलाईन वर्कर या नात्याने शिक्षक कर्मचार्याचे प्राधान्याने लसीकरण व्हावे. दिव्यांग, महिला कर्मचारी व गंभीर आजार ग्रस्त कर्मचार्यांना कोरोना कामातून वगळावे. सर्वच शिक्षक कर्मचार्यांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रांची व्यवस्था व्हावी अशी मागणी जगताप गटाचे युवानेते शंभुराजे जगताप यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सोलापुर यांचेकडे केली आहे.