आरोपीची रजा संपुनही झाला नाही हजर ; साधुच्या वेशात करमाळा तालुक्यातुन अटक
करमाळा प्रतिनिधी –
सात वर्षाची शिक्षा भोगत असताना कोविड काळात पंचेचाळीस दिवस व ६९० दिवस कोरोना काळ अशी रजा मिळवल्यानंतर आरोपी घरी गेला पण माघारी आलाच नाही. त्यामुळे त्यावर येरवडा कारागृह पुणे यांच्या वतीने करमाळा पोलीस ठाण्यात दि १४ जुन रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान करमाळा तालुक्यातील पोलिसांनी त्याचा शोध घेतला त्या वेळी तो साधूच्या वेशात मिळून आला आहे. त्यास ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरु आहे अशी माहीती पोलिस निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांनी दिली.

मोतीराम मरीबा ओहळ रा. मिरगव्हाण असे आरोपीचे नाव आहे. २०१८ मध्ये बार्शी येथील न्यायालयाने त्यास सात वर्ष शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यास अटक करून येरवडा कारागृह पुणे येथे पाठवण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिरगव्हाण ता. करमाळा येथील एका प्रकरणात मोतिराम ओहळ यांच्यावर ३०४/२ प्रमाणे एकाच्या मृत्युस जबाबदार म्हणुन गुन्हा सिद्ध झाला होता. त्यांना बार्शी येथील न्यायालयाने सात वर्ष व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. ओहोळ यांना पुणे येथील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते.
कोरोना देशभर परसला तेव्हा ओहोळ यांना १५ मे २० ते २८ जुन २० पर्यंत ४५ दिवसांची कोविड आपत्कालीन आकस्मिक अभिवचन रजा देण्यात आली होती. ती रजा पुन्हा वाढवून ६९० दिवसांची केली. १९ मे २२ पर्यंत ही रजा वाढवण्यात आली होती. ही मुदत संपुन हजर होण्याची वाढीव मुदत ३ जून २२ पर्यंत संपलेली असताना सदर आरोपी हे पुन्हा कारागृहाकडे फिरकले नाहीत.
त्याशिवाय रजेच्या कालावधीत करमाळा पोलीस ठाण्यात हजेरी देण्याच्या ही सूचना त्यांनी पाळलेल्या नाही. अखेर ते मिळून न आल्याने त्यांचा शोध घेऊन करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यावेळी ओहोळ हे साधू वेशात गावोगावी फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांचा तपास करून नातेवाइकांना कडून माहिती घेतली व त्यांचा तपास लागताच करमाळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी अमोल जगताप व सोमनाथ जगताप यांनी ओहोळ यांना ताब्यात घेतले. पुढील तपास हवालदार अझर शेख हे करीत आहेत.