राज्यसेवेतून वन विभागात आय एफ एस पदावर जाणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या महिला अधिकारी ; करमाळ्याची कन्या बार्शीची सुन दोन्ही तालुक्यात कौतुक
करमाळा समाचार
सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय अधिकारी सुवर्णा रवींद्र माने झोळ यांची राज्य सेवेतून केंद्रीय सेवेत पदोन्नती झाली. त्यांची 2016 च्या भारतीय वन सेवेच्या (आयएफएस) तुकडीत नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसेवेतून वन विभागात या पदावर जाणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या महिला अधिकारी ठरले आहेत. सुवर्णा माने झोळ या वैराग चा सून तर करमाळ्याच्या कन्या आहे.

वनविभागात आजपर्यंत वनरक्षक, वनपाल, वनक्षेत्रपाल या पदावर महिलांनी काम केले होते. 2009 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पहिल्यांदा सहाय्यक वनरक्षक या वर्ग-1 च्या पदावर आठ महिला व पंचवीस पुरुष यांची नियुक्ती केली गेली. आज त्या तुकडीचे सहा अधिकारी भारतीय वन सेवेतील दाखल झाले आहेत. त्यापैकी सुवर्णा माने या एकमेव महिला आहेत. त्या या पदावर राज्य सेवेतून जाणाऱ्या राज्यातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) व भारतीय वन सेवा (आयएफएस) या तीन अखिल भारतीय सेवा मध्ये सरळ सेवेने व राज्य सेवेतून पदोन्नती अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. त्यात भारतीय वन सेवेतील सुवर्णा माने यांची निवड झाली.
सुवर्णा माने या मूळच्या करमाळा तालुक्यातील वाशिंबे या गावच्या आहेत. तर त्यांचे सासर वैराग तालुका बार्शी हे आहे. त्यांचे पती रवींद्र माने हे सध्या प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या पदावर सोलापूर येथे कार्यरत आहेत.