करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

गांजा, इंजेक्शन, ड्रग्स, बनावट दारु मुळे तालुक्याचे नाव राज्यभर चर्चेत ; कर्तव्यदक्ष अधिकारी कशात व्यस्त ? नागरिकांचा प्रश्न

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील आणखी एक प्रकरण उजेडात आले आहे. मोठ्याप्रमाणावर गांजा मिळुन आल्यानंतर प्रमुख फिर्यादीच्या घरुनही गांजा जप्त केला आहे. पुणे पोलिस ही कारवाई करतात तर करमाळा पोलिसांच्या नजरेत या गोष्टी कशा पडल्या नाहीत. मागील काही दिवसात करमाळ्याचे नाव राज्यभर चर्चेत आले आहे. येवढ्या मोठ्याप्रमाणावर गांजा तस्करी, एम डी ड्रग्स विक्री, बनावट दारु व इंजेक्शन चे वाढते प्रमाण करमाळा तालुक्यात असताना तालुक्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी नेमके कशात व्यस्त आहेत हा प्रश्न उपस्थित होत आहे.

यावेळी पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने लोणीकंद परिसरात मोठी कारवाई केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक मदन कांबळे आणि त्यांच्या पथकाला गस्तीदरम्यान पोलिस अंमलदार ऋषिकेश ताकवणे यांच्याकडून गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केसनंद-वाडेबोल्हाई रोडलगत बोल्हाईमाता मंदिराजवळ सापळा रचण्यात आला.

संशयित कार थांबवून तपासणी केली असता, तिच्या डिक्कीत चार पोत्यांमध्ये 29 प्लास्टिक पिशव्यांत गुंडाळलेला 58.58 किलो गांजा आढळून आला. याप्रकरणी चार आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, त्यांनी हा गांजा पुण्यात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.

पोलिस येवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी करमाळा तालुक्यातही शोध मोहिम राबवली. सदर प्रकरणारील प्रमुख आरोपीच्या करमाळा तालुक्यातील धायखिंडी येथील घरात तपास केला असता आणखी 14 किलो गांजा जप्त करण्यात आला याशिवाय इतर ठिकाणीही शोध घेण्यात आले. यामुळे एकूण जप्त गांज्याचे वजन 72 किलो इतके झाले आहे. पुणे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. तर मग तालुका पोलिस काय करत होते हा प्रश्न आहे.

या कारवाईत अंमली पदार्थांसह कार मिळून एकूण 19.93 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. लोणीकंद पोलिस ठाण्यात याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली असून, अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE