कारखाना कामगारांना अंधारात ठेऊन मालकाची दिवाळी धुमधडाक्यात
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील मोठ्या टेक्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने करमाळा तालुक्यातील चाळीस कामगारांना कामावर ठेवले होते. सदर कामगारांची परप्रांतीय व्यवस्थापका कडून जाणून बुजून पिळवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष संजय घोलप यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. दिवाळी असतानाही कामगारांना अडीचशे रुपये बोनस तर झालेल्या महिन्याचा पगारही न दिल्याने सर्व कामगारांसह मनसे आक्रमक झाली आहे.

शहरापासून काही अंतरावर धनस्मृती टेक्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या ठिकाणी मराठी कामगार व परप्रांतीय कामगार एकाच ठिकाणी काम करतात. स्थानिक कामगार त्या ठिकाणी कामाला आहेत. महिना पूर्ण झाला तरीही अद्याप त्यांना त्यांचा मोबदला दिला गेला नाही. विशेष म्हणजे दिवाळीच्या तोंडावर कामगारांना घरखर्चासाठी अधिकचा बोनस देणे व पगार वेळेवर देणे हे अपेक्षित असताना मिलचे मालक मात्र स्वतःची दिवाळी धुमधडाक्यात साजरी करत असताना कामगारांना मात्र अंधारात ठेवत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, करमाळाच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात धनस्मृती टेक्स्टाइल प्रायव्हेट लिमिटेड झरे फाटा करमाळाच्या मराठी स्थानिक 40 कामगार बरेच दिवस काम करत असताना सुध्दा दिवाळी च्या बोनससाठी पिळवणूक म्हणून 250 ते 500 बोनस म्हणून दिला व महिना भरून पण झालेली 100 % पगार पण देण्यास पण नकार दिला. पुर्ण बोनस एक महिन्याचा पगार मिळावा नाही तर आम्हाला आमची पगार तरी द्या यासाठी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या करमाळाच्या वतीने मा.तहसीलदार करमाळा यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मा.संजय (बापु) घोलप मनसे तालुकाध्यक्ष, मा.अशोक गोफणे तालुकाउपाध्यक्ष मा.रोहीत फुटाणे ,शहउपाध्यक्ष,मा.सुशिल नरूटे व सर्व कामगार उपस्थित होते.