सुरक्षा भिंतीचे 10 महिन्यापूर्वीच उद्घाटन झाले पण भितींला गेले तडे
केत्तूर ( अभय माने)
करमाळा तालुक्यातील रामवाडी रेल्वे गेट नं. 25 या ठिकाणी सुरक्षा भिंतीला तडे गेल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने कोणत्याही अपघाताची वाट न पाहता लवकरात लवकर पाहणी करून या ठिकाणी त्वरित उपाय योजना करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी व वाहन चालकांनी केली आहे.

रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे तालुक्यातील सर्वच रेल्वे गेट बंद करून भुयारी मार्ग तयार करण्यात आले. काही ठिकाणी उड्डान पुलाची गरज होती परंतु, या ठिकाणीही भुयारी मार्गच तयार करण्यात आल्याने हे भुयारी मार्ग हे कुचकामी, निकृष्ठ दर्जाचे व गैरसोयीचे झाले आहेत. सध्या परिसरात चार-पाच दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही भुयारी मार्गात पाणी साचत आहे. पारेवाडी येथील गेट नं. 27 जवळील रेल्वेच्या बाजूने असणारी व संरक्षित भिंत नसलेली दरडही कोसळण्याच्या मार्गावर आहे.

” या सुरक्षा भिंतीचे 10 महिन्यापूर्वीच उद्घाटन झाले होते. एवढ्या कमी कालावधीत तडे गेल्याने आगामी काळात मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. साखर कारखाने सुरू झाल्यानंतर या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक सुरू होते
– अजित झाझुर्णे, रामवाडी
” रेल्वे विभागाने चुकीच्या पद्धतीने भुयारी मार्ग तयार केल्याने या मार्गावरून एसटीची प्रवासी वाहतूक होऊ शकत नाही असे एसटी आगार प्रमुखांनी सांगितले आहे त्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना व ग्रामस्थांना बसला आहे.
-संतोष वारगड,माजी सरपंच,रामवाडी
” उद्याच त्या ठिकाणी संबंधित इंजिनीयरला पाठवून पाहणी करण्यात येईल व पुढील कारवाईकरण करू
– एस. ताजुद्दीन.विभागीय व्यवस्थापकांचे सचिव
छायाचित्र – रामवाडी सुरक्षा भिंतीला पडलेले तडे