करमाळाकृषीसहकारसोलापूर जिल्हासोलापूर शहर

पुर्वभागावर जलसंकट ; कोळगाव धरणाचे पाणी आटल्याने चिंतेचा विषय

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील उजनी व कोळगाव दोन धरणांपैकी एक असलेले कोळगाव धरणात पाण्याचा ठणठणाट झाला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यात पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सुदैवाने अहमदनगर जिल्ह्यात व परिसरात पाऊस झाल्याने तरटगाव व संगोबा बंधाऱ्याला पाणी आले. पण ते पाणीही किती काळ टिकेल हा मोठा प्रश्न आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी शंभर टक्के असलेले धरण यंदा मात्र पाण्याचा तुटवडा असुन ३१ टक्के शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. पिण्यासाठी पाणी टिकावे यासाठी या भागात पाणी उपसा करण्यावरही बंदी घालण्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

करमाळा तालुक्यासह परंडा तालुक्यातील जवळपास १२ हजार १०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी या प्रकल्पाला महत्व आहे. कोळगाव धरणात एकुण १५० दलघमी पाणीसाठा होतो. याठिकाणच्या पाण्यावर करमाळा तालुक्यातील चौदा गावांसह परांडा तालुक्यातील गावांचा शेतकऱ्यांचा पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटतो. पण यंदा पाऊस न झाल्याने सदरच्या धरणात केवळ ३५ दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जर पाणी उपसा व वीज बंद केली नाही तर केवळ तीन महिणे हा पाणीसाठा टिकण्याची भिती आहे. त्यामुळे उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी यांनी पुढील पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शेतीसाठी पाणी बंद करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

politics

करमाळा तालुक्यातील कोळगाव, अर्जुन नगर,करंजी मिरगव्हाण, आवाटी, निमगाव या गावांसह तरडगाव व संगोबा येथील बंधारे सदरच्या सीना नदीवर अवलंबून असून कोळगाव धरणात पाणी साठल्यानंतर सदरचा पाणीपुरवठा सात ते आठ महिने चालू शकतो. परंतु यावर्षी पाणी नसल्याने परिसरातील शेतकरी अडचणीत आला आहे. १२ हजार १०० हेक्टर पैकी करमाळा तालुक्यातील ३४०० हेक्टर क्षेत्र हे प्रकल्पीय सिंचन क्षमतेत येते. सीना नदी व पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या धरणक्षेत्रात यंदा पुर्ण दुष्काळ पडल्याने धरण कोरडे पडले आहे.

एकूण १५० दलघमी क्षमता असलेले कोळगाव धरण मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात शंभर टक्के भरले होते. पण यंदा या ठिकाणी केवळ ३५ दलघमी पाणी शिल्लक आहे. सीना नदीच्या गांगर्डी व परंडा तालुक्यातील नळी व खैरी या नद्यांमधून सदरचे पाणी येते परंतु यंदा त्या भागातही पाणी उपलब्ध नसल्याने सदरचे पाणी येऊ शकले नाही. आता केवळ तरटगाव व संगोबा बंधाऱ्यात थोडेसे पाणी आल्याने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु कोळगाव धरणाच्या परिसरात अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मात्र अद्यापही पाण्याची प्रतीक्षा आहे.

प्रतिक्रिया ..
या यावर्षी पाऊस पडलाच नाही त्यामुळे उभी असलेली पिके अगोदरच कशीबशी जिवंत आहेत. उसाची तर वाढ पण झालेली नाही. इतर पिकेही वाया गेले आहेत. अशा परिस्थितीत वीज कनेक्शन बंद करणे अत्यंत नुकसानीचे होईल. शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याअगोदर शासनाने दुष्काळ जाहीर करावा व ऊस व इतर पिके यांना सरसकट एकरी ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे मगच वीज पुरवठा खंडित करावा. तसेच वाड्यावस्त्यवर राहत असलेल्या लोकांना पिण्यास ही पाणी मिळणार नाही याची नोंद घ्यावी. वीज कनेक्शन बंद केल्यास सर्व धरणग्रस्त शेतकरी बांधव तीव्र आंदोलन करील याची प्रशासनाने नोंद घ्यावी.
– सतीश नीळ, संचालक, मकाई सहकारी कारखाना.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE