प्रत्येक क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्यांची संख्या कमी हाच देशापुढील गंभीर प्रश्न – डॉ. अविनाश पोळ
करमाळा समाचार
सध्या माझी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावांमध्ये भटकंती सुरू आहे. ज्या गावांनी पाणी फाउंडेशनमध्ये उत्तम काम केले, त्या गावां ची आजची परिस्थिती काय आहे याचा शोध घेण्यासाठी माझी वारी सुरू आहे. ही वारी आत्मिक समाधान देणारी आहे. सध्याचा माणूस सुखातही नाही आणि दुःखात ही नाही. त्यामुळे या माणसाला सुखदुःखात सहभागी व्हायला भाग पाडणे , या मातीशी त्याची नाळ जोडणे हे कठीण काम पाणी फाउंडेशन करीत आहे.

संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून सुरू आहे. हे काम करत असताना ज्ञान देण्याचे काम फक्त पाणी फाउंडेशन करते आहे. हे काम करत असताना कोणत्याही सरकारी यंत्रणेला विरोध न करता त्यांच्या सहकार्याने गावचा विकास साधने हे प्रमुख उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. कोणत्याही गावाच्या विकासाला पैशाची अडचण कधीच नसते तर अडचण असते ती माहितीच्या अभावाची आणि माणसांच्या काम न करण्याच्या प्रवृत्तीची .आपल्याला अदृश्य विकासापेक्षा दृश्य विकास महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे आपण समाज मंदिर, रस्ता, हायमास दिवे या गोष्टी गावात आल्या की गावाचा विकास झाला असे म्हणतो .

प्रत्यक्षात समृद्ध गाव स्पर्धेमध्ये दृश्य विकासापेक्षा अदृश्य विकासाला प्राधान्य दिले ले आहे .आज तुमच्या गावात एक हजार लिटर दूध संकलित होत असेल. हेच प्रमाण दुपटीने वाढले आणि ते वाढविण्यासाठी पाणी फाउंडेशनने निर्माण केलेला सकस चारा आणि तंत्र यांचा अवलंब केला तर समृद्धी यायला वेळ लागणार नाही. हीच समृद्धी आणि असाच अदृश्य विकास पाणी फाउंडेशनला अपेक्षित आहे.
समृद्ध गाव स्पर्धेमध्ये जलव्यवस्थापन, गांडूळखत निर्मिती, जैवविविधता , पौष्टिक गवताची लागवड या विषयावर ती भर आहे. त्याचबरोबर गावची आर्थिक सुबत्ता वाढवणे हे समृद्ध गाव स्पर्धेचे अंतिम उद्दिष्ट आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले .
याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, पाणी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक सत्यवान देशमुख, तालुका समन्वयक प्रतिक गुरव, निवासी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव ,शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी आदलिंगे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी गावातील यश मिळवणारे विजयकुमार जाधव, अमोल जगताप आणि अक्षय वीर यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विकास वीर यांनी केले, सूत्रसंचालन उमराव वीर यांनी तर आभार मधुकर शिंदे यांनी मानले.