करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात डिजिटल ठरतोय चर्चेचा विषय ; वैभवराजेंचे आव्हान ! तालुक्याची दिशा बदलणार ?

करमाळा समाचार

महाराष्ट्राच्या राजकारणात कोणतेही पक्ष कुठेतरी गेले आणि कोणत्याही पक्षाच्या कितीही आघाड्या, युती झाल्या तरी करमाळ्याच्या राजकारणात केवळ गटातटाच्या राजकारणालाच कायम किंमत राहिली आहे. तालुक्यात प्रमुख चार गट कायम चर्चेत राहतात. करमाळ्याचे राजकारण कायम या गटांच्या भोवती फिरत राहते. त्यामध्ये जगताप गट हा किंगमेकरच्या भूमिकेत सध्या असल्याचे दिसतो. पण आता वैभवराजेच्या माध्यमातून जगताप गटाला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी गटाच्या राजकुमाराने कंबर कसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे किंगमेकर पुन्हा एकदा ‘किंग’ ठरणार का ?

तालुक्यात विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्या विजयात किंगमेकर म्हणून माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. छत्तीस गावातून मोठ्या प्रमाणावर लीड घेणारे संजयमामा करमाळ्यातून मात्र काहीसे कमी पडताना दिसून येत होते. अशावेळी करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप हे त्यांच्या सोबतीला आले व कृष्णाप्रमाणे त्यांचा सारथी होऊन विजयी रथ हा पार करण्यात सहकार्य केले. जगताप सोबत नसले असते तर सध्या चित्र काहीच वेगळं असलं असतं. त्यामुळे येणाऱ्या काळातही जगतापांची भूमिका महत्त्वाचीच ठरणार आहे हे नक्की.

तर काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप हे विधानसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चांना जोर धरू लागला आहे. तर नुकताच त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या समर्थकांनी ‘भावी आमदार’ असा उल्लेख करीत सर्वत्र डिजिटल फलक लावले आहेत. त्यांनाही विधानसभा लढायचे आहे ही त्यांची इच्छा लपून राहिलेली नाही. मागील काही काळापासून जगताप गट काहीसा मागे पडत असताना जगताप गटाला नवसंजीवनी देण्यासाठी सत्ता गरजेची आहे. मुळातच किंगमेकर असल्याने जरी सत्तेत जगताप असले तरी अपेक्षेपेक्षा जगतापांचे नाव चर्चेत येताना दिसत नाही. आतापर्यंत स्वतः माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर केली नाही. त्यांची भूमिका काय असेल यावर बरचसकाही अवलंबून राहणार आहे.

राज्य पातळीवर भाजपा राष्ट्रवादी व शिंदे गट शिवसेना एकत्र आल्यामुळे युती सरकारची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढलेली असताना तालुक्यात मात्र गटातटाचे राजकारण असल्याने पुन्हा एकदा शिंदे, पाटील, बागल व जगताप या प्रमुख चेहऱ्यांसह चिवटे, झोळ, वारे यासारखे चेहरे समोर येताना दिसणार आहेत. त्यामुळे मतांची विभागणी होऊन कोणत्या गटाचा कोणाला फायदा होईल हे आत्ताच सांगणे घाईचे ठरेल. परंतु जगताप गटाने स्वतः उभारण्याचा निर्णय घेतला तर शिंदे गटाला हे न परवडण्यासारखे आहे. त्यामुळे वैभवराजे जगताप यांच्या भूमिकेकडे शिंदे गटाचे लक्ष लागून राहील. कमीत कमी या भुमिकेमुळे दुर्लक्षित झालेला जगताप गट पुन्हा सक्रिय राजकारणात केंद्रस्थानी येऊ शकेल.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE