काबाडकष्ट करुन संसार फुलवला पण अर्ध्यावरच डाव मोडला ; आजारी आई सोबतही भेट नाहीच
करमाळा –
आयुष्यभर आपल्या पतीसोबत रक्ताचे पाणी करून शेतात काबाडकष्ट करून संसार फुलवला. चांगले दिवस आल्यानंतर घर बांधले घराची अजून वास्तुशांती होण्यापूर्वीच महिलेला हे जग सोडून जाण्याची वेळ आली आहे. शेतामध्ये टोमॅटोचे पीक घेतलेले असताना काम करण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी टोमॅटोसाठी रचलेल्या मंडपावर विद्युत वाहिनी तार तुटून पडल्याने लागलेल्या झटक्याने महिलेला जीव गमवावा लागला आहे. सदरची घटना सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास देवळाली येथे घडले आहे. मुद्रुका संजय गुंड (वय ४५) रा. देवळाली यांचा विद्युत प्रवाहाचे तार तुटून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.

देवळाली येथे कायम टोमॅटोचे पीक घेऊन त्यासाठी शेतामध्ये काबाडकष्ट करणारे गुंड दाम्पत्य कायम शेती व कामाला प्राधान्य देतांना दिसून आले. त्यांनी आपली कोणतीही गरज पूर्ण व्हावी अशी अपेक्षा न करता कायम कष्ट करत राहिले. अखेर मुलाच्या लग्नानंतर एक चांगले घर असावे या हेतूने गुंड दाम्पत्यांनी शेतातच एक घर बांधले. या घराची अजून वास्तुशांती ही पूर्ण झाली नसेल तोपर्यंत सदरची घटना घडल्याने गुंड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सोमवारी मुद्रूका गुंड या नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत सुनबाई सुद्धा शेतात गेल्या होत्या. मुद्रूका यांची आई जास्तच आजारी असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी मृदुका यांचा मुलगा पुण्याच्या दिशेने गेलेला असताना या दोघी शेतात आल्या. शेतातील काम आटपून मुद्रूकाही मंगळवारी पुण्याच्या दिशेने जाणार होत्या. मुद्रूका यांची आई सोबतची भेट होऊ शकली नाही. सकाळी ११ च्या सुमारास शेतात काम करत असताना टोमॅटोसाठी घेतलेल्या मंडपावर विजेची तार पडलेली असल्याचे मुद्रूका व त्यांच्या सुनबाई च्या लक्षात आले नाही.
यावेळी काम करण्यासाठी पुढे सरसावलेल्या मुद्रूका यांच्या हाताला तारेचा स्पर्श झाला व त्या ठिकाणी काही कळण्याआधीच त्यांना जीवाला मुकावे लागले आहे. आजीला बघायला जाणारा नातवाला ही मधूनच माघारी फिरावे लागले. त्यांच्या पश्च्यात पती,मुलगा, सुन, मुलगी आणि नातु असा परिवार आहेत्यांच्यावर दुपारी चार च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
मागील आठवड्यात एक अपघात …
परिसरात लटकणाऱ्या तारा किंवा झाडात असलेल्या तारा या मुळे याला धोका संभवत असतानाही याची दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे पावसाळी तसेच वादळी वातावरणात असे अपघात होणार आहेत. मुळातच पावसाळ्यापुर्वी अशी कामे पुर्ण होणे गरजेचे आहे. मागील वीजेची तार तुटुन त्याचा स्पर्श झाल्याने शुक्रवारी हिवरे येथील युवकाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही लोंबणाऱ्या तारा आवळणे व तारावरील झाडे तोडणी केलेली दिसुन येत नाही.