बुडणाऱ्या दोन युवकांसाठी पांडुरंग म्हणुन धावला करमाळ्याचा युवक
करमाळा समाचार टीम –
चंद्रभागा नदीच्या पाण्याचा कसल्याही प्रकारचा अंदाज न घेता पाण्यात पोहायला गेलेल्या दोन युवकांना भलतेच महागात पडले होते. वेळीच पांडुरंगासारखा आलेल्या करमाळ्याच्या युवकाने धाडसाने त्या दोन युवकांना बुडताना वाचवले म्हणून ते बचावले आहेत. सदरची घटना ही आषाढी एकादशी दिवशी घडली आहे. यावेळी चार मित्र पाण्यात पोहायला गेले होते. त्यातील दोन दम भरल्याने गटांगळ्या खाऊ लागले.

करमाळा तालुक्यातील अमोल ठोंबरे हे आपल्या सहकाऱ्यांसह आषाढी एकादशीच्या वारीसाठी गेले होते. त्याप्रमाणेच दुसऱ्या गावावरून आलेले चार युवक हे वारी करण्यासाठीच त्या ठिकाणी आले होते. तर चंद्रभागा नदीच्या पाण्याचा कसलाही अंदाज न घेता ते पाण्यात पोहण्यासाठी उतरले. यावेळी चार जणांपैकी दोन जणांना दम लागला व ते त्या पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले.

एकदम पाण्याबाहेर येणे शक्य नसल्याने तसेच परिसरात जवळपास कोणी नसल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी कोण दिसत नव्हते. यावेळी करमाळ्याच्या अमोल ठोंबरे यांनी धाडसाने त्या युवकांना वाचवण्याचे ठरवले व पाण्यात उतरला. त्यावेळी बुडणाऱ्या त्या युवकांना अमोल यांनी हाताला धरून बाहेर काढले. यावेळी काही अंतरावर असलेल्या एका नावाड्याने ही त्यांना मदत केली. या दोघांनी मिळून त्या दोघांना बाहेर काढून दोघांचा जीव वाचवला आहे.
त्यामुळे वारी करण्यासाठी आलेल्या त्या युवकांचा जीव वाचवणारा अमोल हा पांडुरंगप्रमाणे धावून आल्याने त्या युवकां चे प्राण वाचले. सदरची माहिती मिळताच सर्वत्र अमोलचे कौतुक होत आहे. तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत व पाण्याचा अंदाज न घेता कुठेही मौजमजा करण्यासाठी जाणे टाळले पाहिजे अन्यथा जीवावर बेतु शकते हे यातून दिसून येते.