जेऊर टेंभुर्णी रस्त्यावर पाच दुकानांचे शटर उचकटुन चोरी
प्रतिनिधी | करमाळा
मध्यरात्री बंद दुकानांचे शटर उचकटून जेऊर ते टेंभुर्णी जाणाऱ्या शेलगाव (वां) येथील डांबरी रोडलगत यादव कॉम्प्लेक्समध्ये पाच दुकानांमधील मुद्देमाल लंपास केला आहे. सदरचा प्रकार शनिवारी पहाटेच्या चारच्या सुमारास उघडकीस आला आहे. प्रकरणाची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी डॉग स्कॉड सह हातांचे ठसे घेणारे पथक पाचारण केले होते.

परंतु रात्री उशिरापर्यंत हाती काहीच लागले नाही. त्यामुळे डॉग स्कॉडला माघारी परतावे लागले. तर आतापर्यंत केवळ दोन दुकानातील एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल गेल्याचे नोंद करण्यात आली आहे. इतर तपास अद्याप सुरु आहे.
जेऊर ते टेंभुर्णी जाणारे डांबरी रोडला यादव कॉम्प्लेक्समध्ये राहुल यादव यांचे कृषी सेवा केंद्र तसेच त्यांच्या शेजारी रोहिदास चव्हाण रा. शेलगाव यांचे कपड्याचे दुकान आहे, वैभव यादव रा. वांगी क्रमांक २ यांचे जगदंबा मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स नावाने दुकान आहे, औदुंबर शिंदे रा. कुंभेज यांचे कपड्याचे दुकान आहे तर विलास गणपत नलवडे रा. बिटरगाव यांचे हार्डवेअर चे दुकान आहे. ही पाचही दुकानं चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास शटर उचकटून फोडली. यामधील मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचही दुकानचे चालक रात्री साधारण आठच्या सुमारास घरी गेले होते. त्याचा फायदा घेत अनोळखी चोरट्यांनी दुकानातील मोबाईल, मशीन व इलेक्ट्रोनिक वस्तुंची चोरी केली आहे. यामध्ये मोटर पंप चार कॉपर केबल बंडल ६० हजार, लॅपटॉप १० हजार, दोन लहान कॉपर केबल बंडल १० हजार, तीन मोबाईल पंचवीस हजार आठशे असा एकूण एक लाख पाच हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल नेला आहे.
सदरचा प्रकार पहाटेच्या वेळी लक्षात आला. त्यानंतर याचोरीची माहीती करमाळा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस उपनिरिक्षक विनायक माहुरकर यांनी घटनास्थळी भेट दिली व डॉग स्कॉड सोबत घेऊन पाहणी केली पण हाती काय लागले नाही. रात्री उशीरापर्यत तपास सुरु होता.