मुलाच्या सेवा निवृतीच्या कार्यक्रमाचे आमंत्रण राहिले अधुरे ; ट्रक अपघातात वृद्धाचा मृत्यु

करमाळा – प्रतिनिधी

मुलगा विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यानिमित्त गावात असलेल्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी गेलेल्या वृद्धास कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन उपचारात पूर्वी मृत्यू झाला आहे. सदरची घटना अहमदनगर टेंभुर्णी महामार्गावर कंदर ता. करमाळा येथील अमोल कृषी केंद्र दुकानाजवळ शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे.

बाळासाहेब रामा कदम (वय ८१) कंदर ता. करमाळा यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कंटेनर चालक सिंटु पासवान रा. समशेर नगर, औरंगाबाद, बिहार याच्याविरोधात करमाळा पोलीस ठाण्यास मृत्यूस जबाबदार म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाळासाहेब यांचा मुलगा कबीर कदम हे ग्रामसेवक म्हणून अकलूज येथे कार्यरत होते. तेथे निवृत्तीच्या वेळी ते विस्तार अधिकारी म्हणून ३१ मे रोजी निवृत्त झाले. ते उद्या कंदर आपल्या गावी येणार होते. त्याठिकाणी त्यांच्या आगमनानंतर कंदर येथे सेवा निवृत्ती बद्दल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील परिचयाच्या व्यक्तींना आमंत्रण देण्यासाठी बाळासाहेब कदम हे पायी गेले होते.

कंदर गावातील अमोल कृषी केंद्र समोरील साईड पट्टी वरून कदम हे जात होते. पाठीमागून येणारा कंटेनर क्रमांक एन. एल. ०१ आर २४६१ याची जोरदार धडक ही कदम यांना बसल्याने डोक्यास गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले. यावेळी कंटेनर न थांबता तसाच पुढे जात असताना गावकऱ्यांनी त्याला थांबवले. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास करमाळा पोलिस करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: Don\'t try to copy. Content is protected !!