आज जागतिक पर्यटन दिन ; उजनी पर्यटन केंद्र विशेष
केत्तूर ( अभय माने)
उजनी धरण हे राज्यातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर म्हणून याची ख्याती आहे. 1970 च्या दशकात साकारलेली उजनी धरण सोलापूर पासून 100 किमी तर पुण्यापासून 155 किमी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील हैद्राबाद ते पुणे या महामार्गावर वसलेली आहे. धरणातील पाणीसाठा 117.25 टीएमसी इतका असून,मृतसाठा 63 टीएमसी एवढा अवाढव्य आहे. पाणलोट क्षेत्र पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यात पसरलेले आहे. धरणाच्या काठावर ऊस, केळी या प्रमुख नगदी पिकांबरोबर भुईमूग, सूर्यफूल, बाजरी, गहू इत्यादी पिके बारमाही बहरून असतात.


धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरक्षित वावर, मुबलक खाद्यान्नाचे उपलब्धता या कारणांमुळे दरवर्षी हिवाळ्यात विदेशी पक्षी स्थलांतर करून येतात. नजाकतदार फ्लेमिंगो, डौलदार पट्टकदंब हंस, कलहंस, मनमोहक, ब्राह्मणी बदकांसह शेकडो प्रजातींचे पक्षी उजनीवर येऊन उजनीला पक्षी निरिक्षकांवर भुरळ घालतात. श्वेतबलाक, मुग्धबलाक, चित्रबलाक, वीसेक प्रकारच्या विदेशी बदके व हिमालय पर्वतश्रेणीतून यूणारे अनेक शिकारी पक्षी या ठिकाणी दाखल होऊन पर्यटकांना आकर्षित करतात.
उजनी पाणलोट क्षेत्रात प्रमुख आकर्षण ठरलेले रोहित पक्षी आकाशात उडताना लाल गुलाबी रंगाची उधळण करीत, एका रांगेत निघताना पाहिल्यानंतर पर्यटकांचा ओढ आपसूकच उजनीच्या परिसरात होते. उन्हाळ्यात उजनीतील पाणीसाठा कमी झाल्यानंतर पाण्याच्या तळाशी गडप झालेले पळसदेव येथील हजारो वर्षापूर्वीचे हेमाडपंथी नागरशैली सप्तभूमीच पद्धतीचे मंदिर,जुन्या गावातील कड्यावरील दगडी मंदिर,काशिनाथ विश्वनाथ यासारखी अतिशय सुबक आशा अप्रतिम मंदिराच्या कलाकृतीचा उत्तम नमुना येथे आल्यानंतर पहावयास मिळतो म्हणून राज्यातील व राज्याबाहेच्या पर्यटकांचे पाऊल उजनी धरणाकडे वळतात. उजनी वर मासेमारी व्यवसाय जोमाने चालतो. पक्षी निरीक्षण, धरणात जलसमाधी मिळालेल्या जुन्या कलाकृती व मत्स्यप्रीय पर्यटक उजनी धरण परिसरात नेहमी गर्दी करतात.
छायाचित्र – कुगाव (ता. करमाळा) उजनी पाणलोट परिसर