गद्दारांना पुन्हा संधी नाही ! ; आमदार रोहित पवारांचे वक्तव्य पुन्हा चर्चेत
करमाळा समाचार
एकेकाळी राष्ट्रवादी मधून मोठे नेते पक्ष सोडून जात असताना राष्ट्रवादी पक्षाला मोठी पोकळी निर्माण झाली होती.उमेदवारीवरून भटकंती करावी लागत होती अशा परिस्थितीत करमाळा तालुक्यात तर एकही योग्य उमेदवार राष्ट्रवादीला मिळालेला नव्हता. त्यामुळे करमाळा विधानसभा मतदारसंघातील माढा तालुक्यातील संजय घाटणेकरांना संधी देण्यात आली. त्यानंतर अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला. पण आता ही परिस्थिती बदललेली दिसून येत आहे. करमाळ्यात माजी आमदात नारायण पाटील फिक्स तर माढ्यात धनराज शिंदेंचे नाव चर्चेत आहेत. याशिवाय राष्ट्रवादी मध्ये जिल्ह्यासह महाराष्ट्रात जोरदार इनकमिंग सुरू आहे.

पुन्हा एकदा राष्ट्रवादी जोमात आल्यानंतर त्यामधून उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. करमाळा माढासह जिल्ह्यातील सर्वच नेते आपापल्या निकटवर्तीयांना किंवा स्वतः जाऊन जेष्ठ नेते शरद पवारांची भेट घेत आहेत व आपले तिकीट निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत. याची कल्पना रोहित पवारांना सहा महिन्यांपूर्वीच आलेली दिसून येते. त्यामुळे त्यांनी तेव्हाच एक इशाराही त्यावेळीच दिला होता. तो इशारा सध्या पुन्हा एकदा समाज माध्यमातून व्हायरल होताना दिसत आहे.

करमाळा तालुक्यातील एका कार्यक्रमात आल्यानंतर त्यांना पत्रकारांनी विविध विषयांवर प्रश्न विचारले. त्यावेळी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सुचक इशारे करीत येणारा काळ महाविकास आघाडीसाठी चांगला असेल हे सांगितले होते. तर आदिनाथ कारखान्यात विरोध करणारे सुद्धा खाजगी कारखानदार असल्याची जाहीर करत त्यामध्ये पुढाकार मंत्री तानाजी सावंत यांनी घेतल्याची जाहीर केले होते. याशिवाय त्यांनी करमाळा माढा विधानसभा मतदारसंघासह सर्वच जागांबाबत स्पष्ट भूमिका घेतली होती.
त्यावेळी रोहित पवार म्हणाले …
२०२४ मध्ये ज्यावेळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होतील. त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वात जास्त जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील. या जागा निवडून येत असताना ज्या ज्या ठिकाणी जे आमदार आहेत ज्यांनी साहेबांच्या विचाराला पाठिंबा दिला नाही त्यांच्यासोबत गद्दारी केली अशा लोकांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे तिथं नवीन चेहरे नवी ताकद महाविकास आघाडी कडून दिली जाणार पण निष्ठावंतांनाच संधी दिली जाईल.