उद्धवजी अतिशय प्रामाणीक व सात्विक माणुस पण …
समाचार टीम –
माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे काल प्रहार संघटनेच्या मेळाव्यानिमित्त तसेच मंगेश चिवटे यांची मुख्यमंत्र्याचे ओएसडी म्हणून निवड झाल्यानंतर आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करमाळा येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

यावेळी माजी मंत्री बच्चू कडू यांना पत्रकारांनी केंद्रीय मंत्री शहा व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात नेमकं कोण खरे बोलतोय असा प्रश्न विचारला. यावेळी कडू यांनी या प्रश्नाला आपण छोटा कार्यकर्ता असून त्यांची चर्चा आपल्यासमोर झाली नाही कोण खरे कोण खोटे हा संशोधनाचा विषय आहे.

तर उद्धव ठाकरे यांच्या बाबत आपला अनुभव कसा असा प्रश्न यावेळी विचारला असता बच्चू कडू म्हणाले मी उद्धव ठाकरे हे अतिशय प्रामाणिक व सात्विक माणूस आहे. परंतु ते पक्षप्रमुख म्हणून शोभतात पण मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाल हा अडचणीचा ठरला आहे. उद्धवजी जेवढे सेना भवनात शोभुन दिसले तेवढे वर्षा बंगल्यावर शोभुन दिसले नाही असे सांगायलाही कडु विसरले नाहीत.
तर मंत्रीपद नेमकं कशासाठी पाहिजे हेही यावेळी कडू यांनी स्पष्ट केले. सत्ता असणे गरजेचे असून सत्तेत मोठी पद असल्यानंतर कामे पटापट होतात. तर सत्ता नसेल तर आंदोलने लाठी, काठी खाऊन मागण्या मान्य करून घेणे थोडेसे वेळ खाऊ आहे. तर सत्तेत असताना आपण तात्काळ कामे मार्गी लावू शकतो. त्यासाठी मंत्री पद असणे गरजेचे आहे.
मंत्रीपद मिळवणे आपला स्वार्थ जरी असला तरी आपल्या स्वार्थांपेक्षा सामाजिक स्वार्थ हा अधिक असला पाहिजे. त्या पद्धतीने आपण अपंग मंत्रालयाची स्थापना करून त्याची मंत्रिपद आपणास दिल्यास देशात नाव घेतले जाईल असे काम आपण करून दाखवू असाही मानस यावेळी कडू यांनी बोलून दाखवला. तर आपल्या राज्यमंत्री कार्यकाळात अनाथांना आपण आरक्षण दिले होते. त्यातील आठ अनाथांना आज नोकरी लागली आहे असेच काम आपण अपंगांसाठी करू इच्छितो. त्यासाठी मंत्रिपदाची गरज असल्याचेही ते म्हणाले.