लोकसभेपुरता जगतापांचा वापर ? ; निवडणुक झाल्यानंतर जगताप बडतर्फ !
करमाळा समाचार
लोकसभा निवडणुकामध्ये झालेल्या पराभवानंतर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी जगताप गटाचे युवा नेते तथा सोलापूर ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांना पदावरून बडतर्फ केले असल्याचे पत्र दिले आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला पराभव पत्करावा करावा लागला होता. यामध्ये जगताप गटाच्या वतीने दोन्ही बंधू वेगवेगळी भूमिका घेऊन मैदानात उतरले होते. एकीकडे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप हे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत काम करत होते. तर शंभूराजे जगताप हे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी प्रचार करताना दिसून येत होते.

दरम्यानच्या काळात पक्षाकडे गेलेल्या अहवालानुसार शंभूराजे जगताप यांना पक्षविरोधी काम केल्यामुळे बडतर्फीची कारवाई करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भाचे पत्र दिले आहे.
तर जगताप गटाचा वापर केवळ लोकसभा निवडणुकां पुरता केला जातो. नंतर त्यांना वेगळीकडे टाकले जाते अशा चर्चा सुरु आहेत. तर “झाले काम हो लांब अशा” पद्धतीने सदरची कारवाई झाल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे वर झालेली ही कारवाई थोडीशी कठोर असल्याचे मानली जात आहे. या कारवाईमुळे शंभूराजे समर्थक नाराज असल्याचे बोलले जात आहे.