कमलाभवानी शुगर च्या ऊसतोड कामगारांना लसीकरण
करमाळा समाचार -संजय साखरे
कमलाभवानी शुगर्स लिमिटेड ,पांडे तालुका करमाळा या साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांना आज कोर्टी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने ऊस तोड फडात जाऊन कोरोना लसीकरण करण्यात आले.

गेल्या तीन महिन्यापासून ऊस तोड कामगार धुळे-नंदुरबार, सटाणा, जालना, बीड, हिंगोली, नाशिक आदी भागातून येऊन ऊस तोड करीत आहेत. या ऊस तोड कामगार मध्ये कोरोना लसीबद्दलचे असणारे गैरसमज यामुळे बऱ्याच कामगारांनी अद्यापर्यंत लस घेतल्या नव्हत्या. तिसऱ्या लाटेचा वाढता धोका लक्षात घेता कमलाभवानी कारखान्याच्या शेती विभागाच्या वतीने लस न घेतलेल्या ऊसतोड कामगारांचा सर्वे करण्यात आला.

त्यानुसार आज कोर्टी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर वृषाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक श्री दहिफळे व आरोग्य सेविका सौ.कोल्हे मॅडम यांनी आज ऊसतोड मजुरांना कुंभारगाव, सावडी, वाशिंबे, उमरड आदी भागात जाऊन लसीकरण केले.
यावेळी कमला भवानी शुगर चे मुख्य शेती अधिकारी श्री जगदाळे साहेब, ॲग्री ओव्हरसियर श्री सरवदे एस पी व शेती मदतनीस किशोर खराडे आदी उपस्थित होते.