दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी धरणे आंदोलनाचा इशारा..
करमाळा प्रतिनिधी सुनिल भोसले
दिल्ली येथे २६ नोव्हेंबर २०२० पासून चालू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठींब्यासाठी दि. २९ जानेवारी रोजी करमाळ्यातील शेतकरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे डॉ. अमोल दुरंदे, दशरथ कांबळे व ॲड. सविता शिंदे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले तीन काळे कायदे रद्द करावेत म्हणून देशभरातील शेकडो शेतकरी संघटना दिल्ली येथे 26 नोव्हेंबर 2019 पासून आंदोलन करत आहेत. सरकार बरोबर चर्चांच्या अनेक बैठका होऊनही सरकार शेतकरी आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्यास तयार नाही. तरीही दोन महिन्यांपासून शेतकरी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहेत. दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी म्हणजेच २६ जानेवारी रोजी लाखो शेतकरी शांततामय मार्गाने ट्रॅक्टर मार्च काढत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व आंदोलनांमध्ये आपापल्या परीने सहभागी होता यावे यासाठीच करमाळा तालुक्यातील शेतकरी तहसील कार्यालयासमोर दिनांक २९ जानेवारी रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लाक्षणिक धरणे आंदोलन करत असल्याचे निवेदनाद्वारे तहसीलदार यांना इशारा दिला.

सदर निवेदनावर अण्णासाहेब सुपनवर, गजानन ननवरे, सोमनाथ वाघमारे, अशोक जाधव, हरिभाऊ हिरडे, कयूम शेख, शांतीलाल दुरंदे, ज्ञानेश्वर दुरंडे, योगेश सराटे, रवी गोडसे, बापू फरतडे, अमोल घुमरे, कांतीलाल शिंदे, दत्तात्रय घोडके, सुदर्शन शेळके, मानसिंग खंडागळे इत्यादी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. पथनाट्य व लघुनाटीकांद्वारेही शेतकरी प्रश्नावर जागृती करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.