पाऊस चांगला झाल्याने मांगीत पाणी यात पुढाऱ्यांचे योगदान काय ?
ओव्हर फ्लोचे पाण्याने मांगीतलाव भरला यात पुढाऱ्यांचे योगदान काय?? उन्हाळ्यात पाणी न आल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांची नुकसान झाले याला जबाबदार कोण –जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा प्रश्न !!
– करमाळा समाचार –

गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात कुकडीचे करमाळ्याचे हक्काचे पाणी करमाळा तालुक्यात मांगी तलावात आले नाही. यामुळे उभ्या क्षेत्रातील हजारो हेक्टर ऊस केळीसारखी नगदी पिके जळून गेली. उन्हाळीकांद्याची लागवड झाली नाही. शेतकऱ्यांचे करोडो रुपयांची नुकसान झाले. मांगी तलावावरील पिण्याच्या पाणी पुरवठा योजना सुद्धा बंद पडल्या. त्यामुळे गतवर्षी मांगी तलावात पाणी आले नाही या अपयशाचे धनी कोण?? असा सवाल जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे उपस्थित केला आहे.

कुकडी प्रकल्पातील सर्व धरणे भरल्यानंतर ओवर फ्लोचे पाणी खाली सोडावेच लागते. कोणी मागणी केली नाही तरी शासनाच्या नियमाप्रमाणे पाणी सोडावेच लागते. या पाण्याने मांगी तलाव भरला ही आनंदाची गोष्ट आहे. पाऊस काळ चांगला झाल्यामुळे धरणे भरली व ओव्हर फ्लो चे पाणी मांगी तलावात जलसंपदा खात्याला सोडावी लागली.
मात्र या पाण्याची श्रेय लाटण्यासाठी चाललेली प्रसिद्धी ही हास्यस्पद असून तालुक्यातील जनता चाणाक्ष आहे अशा खोट्या प्रसिद्धीला बळी पडणार नाही. मांगी तलावात कायमस्वरूपी पाणी येण्यासाठी रिटेवाडी उपसा सिंचन योजना करणे गरजेचे असून ही योजना मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असून या योजनेचा सर्वे करण्याची निविदा शासनाने प्रसिद्धी करून संबंधित एजन्सीची नेमणूक केली आहे.