शिवसेनाला (शिंदे गट) डावलणाऱ्या निंबाळकरांचा प्रचार करणार नाही ; शिंदे गटाचे समर्थक नाराज
करमाळा समाचार – विशाल घोलप
माढ्यातील उमेदवारीवरून आधीच मोहिते पाटील व निंबाळकर यांच्यात वाद सुरू असताना आता शिंदे गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी आवटे यांचे चिरंजीव तथा शिंदे गटाचे समर्थक बिभीषण आवटे यांनी निंबाळकर यांच्यावर शिंदे गटाला डावल्याचा आरोप केला आहे. तसेच काही दिवसापूर्वी शिवसेनेचे शहराध्यक्ष विशाल गायकवाड यांनीही अशीच तक्रार केली होती.

लोकसभेच्या उमेदवारीवरून सध्या महायुती आपला उमेदवार बदलेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रोज नवीन नावाची चर्चा होऊ लागली आहे. तर उमेदवारी जाहीर झाल्यापासून निंबाळकर यांच्या दौऱ्याला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या उमेदवारीत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे अशा परिस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आपण काम करणार नसल्याची भूमिका घेतल्याने आता उमेदवारी मिळाली तरी नवा पेच निंबाळकर यांच्यासमोर उभा राहिला आहे.

याबाबत बिभीषण आवटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, निंबाळकर यांच्यासाठी आम्ही जीवाचे रान करून निवडणुकीचा प्रचार केला व मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. पण निवडणूक झाल्यानंतर निंबाळकर यांनी आम्हाला डावलले असून आम्ही सुचवलेली विकास कामे केलेली नाहीत. शिवाय संपर्कही कधी केला नाही. निवडणुका जवळ आल्या की त्यांना पुन्हा शिवसेना व पदाधिकारी दिसू लागतात.
महायुती मधून जर निंबाळकर यांना उमेदवारी मिळत असेल तर आम्ही सदरच्या प्रचारात उतरणार नसल्याचे आवटे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सुचवलेले गावातील एकही काम मंजूर न झाल्याचंही खापर निंबाळकर यांच्यावर फोडले.