आया बहिणींवर लाठीचार्ज करणाऱ्यांना तुम्ही मतदान देणार का ?
कंदर प्रतिनिधी –
ज्या फडणीसांनी आपल्या आया बहिणींवर लाठीचार्ज केला. त्यांना मराठा आरक्षण मागताना रक्तबंबाळ केले अशा लोकांची साथ देणाऱ्यांना तुम्ही मतदान देणार का ? असा सवाल सुनील बापू सावंत यांनी कंदर येथे बोलताना केला. ते महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण आबा पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार जयवंतराव जगताप उपस्थित होते.
तालुक्याचा विकास केवळ कागदावरच दिसत असून 3000 कोटी गेले कुठे ? असा प्रश्न यावेळी सुनील सावंत यांनी विचारला. हुकूमशाही आणि गुंडगिरीच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांना आता करमाळा तालुक्यातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत रोज करमाळा पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढलं होतं. विरोधकांचे ऐकले जात नव्हते. तर सत्ताधारी पाहिजे तसे गुन्हे दाखल करून घेत होते. मध्येच कुठे ना कुठे हल्ले करून दहशत माजवली जायची अशांवर ताबा मिळवण्यासाठी नारायण आबांच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन यावेळी सावंत यांनी केले.
तर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांना पाठिंबा देत फडवणीस यांचा पाठिंबा त्यांना असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे ज्याने आपल्या माता भगिनींवर लाठीचार्ज केला अशा लोकांना तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री करायला जात असाल तर आपला समाज त्यांना कधीच माफ करणार नाही. सावंत गटाच्या माध्यमातून करमाळा शहर व पांडे गटातून तसेच जयवंतराव जगताप यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लीड देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुमच्या भागातूनही लीड द्यावा अशी विनंती यावेळी सावंत यांनी केली.
यावेळी शंभुराजे जगताप,संतोष वारे,सुनिल सावंत राहुल सावंत, नवनाथ बापु झोळ, अजित तळेकर, सरपंच मौलासाहेब मुलाणी, भास्कर भांगे, नवनाथ शिंदे, गोपाळ मंगवडे, बिभिषण आवटे, शेखर गाडे, गहीनीनाथ ननवरे, बंडु माने, दिलदार मुलाणी, अकलाख जाहागिरदार, विजय नवले, दिपक मंजुळे आदिसह मोठ्याप्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.