जागतिक निसर्ग संरक्षण दिन – हवेची शुध्दत्ता ढासळतेय; हवा प्रदुषणावर नियंत्रणासाठी प्रयत्न आवश्यक
– किशोरकुमार शिंदे , जेष्ठ पत्रकार
मानवासह सर्वच जीवसृष्टीसाठी शुध्द हवा ही फार गरजेची आहे. मात्र आधुनिकीकरण होत असताना हवेची शुध्दता ढासळत असल्याचे वास्तव असताना त्याकडे गंभीरतेने लक्ष दिले जात नाही. शुद्ध हवेची गरज विचारात घेता वेळीच सावध होवून प्रामुख्याने वृक्ष लागवडीसह वृक्ष संवर्धनाकडे लक्ष दिले जाणे आणि हवा प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस प्रयत्न होणे आवश्यक आहे. हवेची गुणवत्ता अशीच ढासळत राहिली तर पुढील काळात अधिक गंभीर परिस्थितीला तोंड देण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हवेमध्ये नायट्रोजन ७८.०९ टक्के, ऑक्सिजन २०.९५ टक्के, ऑर्गन ०.९३ टक्के, कार्बन डाय ऑक्साइड ०.०४ टक्के आणि इतर वायू असे प्रमाण सामान्यपणे असते. मात्र अलीकडे योग्य तपासणी झाली तर या प्रमाणात विस्कळीतपणा आलेला असल्याचे समोर येईल. ऑक्सिजनचे प्रमाण कमी होवून कार्बन मोनॉक्साइड, ओझोन, नायट्रोजन डाय ऑक्साईड, सल्पर डाय ऑक्साईड, कार्बन डाय ऑक्साईड अशा अतिप्रमाणामुळे अपायकारक ठरणाऱ्या वायूंचे प्रमाण वाढत चालले आहे. एकूणच हवेची शुद्धता ढासळून गेली असल्याचे वास्तव आजुबाजूला पाहिल्यावर जाणवत आहे.

वाहनांमधून बाहेर पडणारा धूर आणि काजळी, रस्त्यावरुन उडणारी धूळ, बांधकामांवरुन येणारी धूळ, कारखान्यातून बाहेर येणारा धूर, पेट्रोल पंपावरुन पेट्रोल भरताना बाहेर उडणारे पेट्रोल, रंग, शेतीत फवारणी होणारे रसायन, रस्त्याकडेला वा सार्वजनिक ठिकाणी फेकला गेलेला कचरा कुजून येणारा घाण वास याचा अनुभव कमी – अधिक प्रमाणात प्रत्येकाला येत असतो. हे अनुभव म्हणजेच हवेची गुणवत्ता ढासळल्याची आणि त्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाची लक्षणे आहेत. मात्र त्याबाबत फारसे गंभीरतेने घेतले जात नसल्याने हवेचे प्रदूषण वाढत जावून आरोग्य धोक्यात येवू लागले आहे हे निश्चित आहे.
अशुद्ध हवेचे दुष्परिणाम
—
अशुद्ध किंवा प्रदुषित हवेचे मानवांसह, प्राणी, पक्षी, पिके, वनस्पती, इतर जीवजंतू अशा घटकांवर दुष्परिणाम होतात. दमा, अस्थमा व वेगवेगळे फुफ्फुसाचे, श्वसनाचे विकार, त्वचा विकार, डोळ्यांचे आजार वाढतात. याशिवाय तापमान वाढीची समस्या अधिक गंभीर होवून पर्यावरणावर मोठा विपरीत परिणाम होतो. अलीकडील काळात सातत्याने होणारे सर्दी, खोकल्यासारखे आजार यालाही अशुद्ध हवा कारणीभूत ठरत आहेत. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, रुग्ण, गर्भवती महिला यांच्या आरोग्याच्या समस्या अशुद्ध हवेमुळे मोठ्या प्रमाणात वाढतात.
हवा प्रदुषणाची कारणे
—
अलीकडील काळात पर्यावरणाची नैसर्गिक रचना बदलून गेली आहे. आधुनिकीकरणामुळे निसर्गाचे नुकसान झाले आहे. बदलते आधुनिकीकरण हवा प्रदुषणाचे कारण ठरु लागले आहे. वाढती वाहने व इंधनांचा होणारा वाढता वापर, मानवी वस्तीजवळ असणारे वेगवेगळे कारखाने, रस्ते, बांधकामे व इतर कारणांमुळे होणारी वृक्षतोड, रसायनांचा वाढता वापर, इमारतींना रंग देण्यासाठी वापरले जाणारे रसायनयुक्त रंग, कचरा व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट व्यवस्था नसते यामुळे हवेचे प्रदूषण वाढले आहे. तसेच खराब, खड्डेमय रस्ते आणि वाढती बांधकामे यामुळेही हवेची शुद्धता गायब होत आहे.
आपण काय करु शकतो?
—
हवेचे प्रदूषण हा मुद्दा गंभीर बनला आहे. शुद्ध हवा मिळविणे हे अवघड होवू शकले आहे. दिल्लीसारख्या शहरात अशुद्ध हवेमुळे सर्वसामान्यपणे जगणे असह्य बनल्याचे उदाहरण आहे. मोठ्या शहराला बसणारी प्रदुषणाची झळ प्रकार आता निमशहरी भागातही जाणवू लागली आहे. ही झळ ग्रामीण भागास बसण्यासही वेळ लागणार नाही. या पार्श्वभुमीवर नागरिकांनी आताच सावध होणे गरजेचे आहे. हवा प्रदुषणाला आळा घालणे हे सोपे नाही. मात्र जागरुक नागरिक म्हणून आपण वृक्ष लागवड आणि संवर्धनावर भर देवू शकतो. हवेची शुद्धता राखण्यात झाडे चांगले काम करतात. त्यामुळे प्राणवायू असणाऱ्या अॉक्सिजनचे प्रमाण चांगले राखण्यात यश येवू शकते. तसेच इंधने, रासायनिक पदार्थ यांचा अनावश्यक वापर टाळता येवू शकतो.
धूर , काजळी, धुळीचे कण आरोग्यास घातक
—
वाहने, कारखाने, वीटभट्ट्या वा इतर ठिकाणांहून निघणारा धूर व काजळीचे कण तसेच धुळीचे कण हे आरोग्यास घातक ठरतात. त्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जीवनास आवश्यक असणारा अॉक्सिजन कमी होवून आरोग्यास हानिकारक विषारी वायू वाढत असताना निर्माण होणाऱ्या परिस्थितीबाबत उदासीन राहणे हे पुढील काळासाठी धोकादायक ठरु शकते.
... तर शुद्ध हवेसाठी मोजावे लागतील पैसे
—
हवेतील विषारी वायू असेच वाढत राहिले तर काही काळानंतर शुद्ध हवेसाठी पैसे मोजावे लागतील अशी वेळ येईल. ‘आमच्याकडे ऑक्सिजनयुक्त शुद्ध हवा मिळेल’ असे फलक लागलेली दुकाने दिसू लागतील. अलीकडे पिण्याच्या पाण्यासाठी जसे पैसे मोजावे लागत आहेत आणि पाणी विक्रीचा व्यवसाय जसा तेजीत चालू आहे. अगदी त्याचा प्रमाणे कमी – अधिक प्रमाणात हवेबाबत घडल्यास नवल वाटणार नाही.