गतवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रदिन थोड्याच ठिकाणी साजरा होणार ; ध्वजारोहणासाठी मोजक्या लोकांना संधी
करमाळा समाचार
महाराष्ट्र राज्यामधील कोरोना बाधितांची वाढते रुग्ण संख्या विचारात घेऊन कोरोना विषाणू ची साखळी तोडण्याकरता व सदर विषाणूचा प्रसार होण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने 13 एप्रिल रोजी निर्बंध लागू केले आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी तरतुदी विचारात घेऊन राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन समारंभ गत वर्षीप्रमाणेच अत्यंत साधेपणाने करण्याच्या दृष्टीने निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे तालुका पातळीवर होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. याबाबतचे पत्रक अवर सचिव महाराष्ट्र शासन राजेंद्र गायकवाड यांनी काढले आहे.

जिल्हा मुख्यालय केवळ एकाच ठिकाणी सकाळी आठ वाजता ध्वजारोहन करण्यात यावे. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांनी ध्वजारोहण समारंभ करता योग्य ती व्यवस्था करावी. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करू नये. इतर सर्व जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे.

शिवाय ज्या ठिकाणी परवानगी देण्यात आली आहे. त्याठिकाणी फक्त पालक मंत्री विभागीय आयुक्त, मुख्यालय समारंभ असल्यास विभागीय आयुक्त, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, ज्याठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे त्या ठिकाणी पोलिस आयुक्त, आयुक्त, महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद एवढ्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे ही इतर मान्यवरांना आमंत्रण देण्यात येऊ नये असे आदेश दिले आहेत. तसेच कवायती व संचलने आयोजन करू नये असेही सांगण्यात आले आहे. विधिमंडळ मा. उच्च न्यायालय व संविधानिक कार्यालय येथे कमीत कमी गर्दीत ध्वजारोहण करण्यास परवानगी आहे.