करमाळासोलापूर जिल्हा

रेल्वे थांब्यासाठी केत्तुर ते पारेवाडी महामोर्चा ; मोर्च्यात वारकऱ्यांसह विद्यार्थी सहभागी

करमाळा समाचार -संजय साखरे


करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असलेल्या पारेवाडी रेल्वे स्टेशन वर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळवण्यासाठी केतुर आणि पंचक्रोशीतील नागरिकांचा अति भव्य मोर्चा काढुन पारेवाडी रेल्वे स्टेशनवर आज सकाळी मागण्या करण्यात आल्या.

पारेवाडी हे करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. हा सर्व भाग उजनी बॅक वॉटर परिसरामध्ये येत असल्याने या भागातील शेतकरी उसाबरोबरच अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर फळबागांची शेती करू लागला आहे. यामुळे येथे लोकांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे. या परिसरातील अनेक लोक दररोज पुणे -मुंबईसारख्या ठिकाणी ये- जा करतात. अलीकडच्या काळात पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्याला जोडणारा ब्रिटिशकालीन डिकसळ पूल रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

त्यामुळे या भागातील लोकांची आणखी गैरसोय झाली आहे. याशिवाय अनेक शालेय विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने पुणे- मुंबईसारख्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. असे असताना देखील पारेवाडी रेल्वे स्टेशनवर फक्त पॅसेंजर गाडीला थांबा आहे. त्यामुळे या भागातील लोकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी पारेवाडी रेल्वे स्टेशनवर हैदराबाद- मुंबई एक्सप्रेस व चेन्नई- मुंबई (मेल )या दोन गाड्यांना थांबा मिळवण्यासाठी आज केत्तुर ग्रामपंचायत कार्यालय ते पारेवाडी रेल्वे स्टेशन असा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

या मोर्चामध्ये केत्तुर पंचक्रोशीतील वाशिंबे ,गोयेगाव, पारेवाडी, उंदरगाव, सोगाव, मांजरगाव, राजुरी, कोर्टी, सावडी, , देलवडी, जिंती,कोंढार चिंचोली,कात्रज, भगतवाडी, दिवेगव्हान, पोमलवाडी, हिंगणी,  भगतवाडी,  कुंभारगाव, टाकळी, पारेवाडी या परिस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज सकाळी 11 वाजता केत्तुर ग्रामपंचायत कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली. टाळ पखवाज च्या गजरात वारकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

केतुर येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी शालेय गणवेशा मध्ये या मोर्चात सहभागी झाले होते. याशिवाय शासकीय कर्मचाऱ्यांचा संप असताना देखील विद्यालयाचे शिक्षक देखील या संपामध्ये सहभागी झाले होते.

मोर्चा पारेवाडी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्टेशन मास्तर श्री शिरसाठ यांनी मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारले.व आपल्या भावना त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन मोर्चे करांना दिले .या मोर्चाला प्रहार संघटना, करमाळा तालुका बार असोसिएशन, करमाळा तालुका मेडिकोज गिल्ड यांनी पाठिंबा दिला.

यावेळी प्रास्ताविक ऍड अजित विघ्ने यांनी केले. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या पश्चिम भागातील अनेक नेत्यांची व मान्यवरांची यावेळी भाषणे झाली व रेल्वे थांबण्यासाठी यापुढील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE