जिल्हा परिषद शाळेत आजी आजोबा दिवस ; संगित खुर्ची खेळायला सहभाग – काठी घेऊन धावले आजोबा
करमाळा समाचार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं.2 ता करमाळा या शाळेत 11 सप्टेंबर हा दिवस आजी आजोबा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या गेट पासूनच दोन रांगा करून येणाऱ्या प्रत्येक आजी आजोबांचे जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केले. आणि त्यांना सन्मानाने खुर्चीवर विराजमान केले. उपस्थित आजी आजोबांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर मुख्याध्यापक बोडखे यांनी घरातील आजी-आजोबांचे महत्त्व , त्यांचे अनुभव, त्यांच्या अनुभवाचा घरातील मुलांना तसेच नातवंडांना कसा फायदा होऊ शकतो, त्यांच्या जीवनातील अनुभवरुपी ज्ञानाचे त्यांच्या नातवांसाठी कसे उपयोजन केले पाहिजे याबाबत उदाहरण देऊन सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच या लहान लहान विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत कुटुंबातील आजी-आजोबांचे किती महत्त्वाचे स्थान आहे हेही पटवून दिले. एकत्र कुटुंब पद्धती , त्यातील विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार, घरातील ज्येष्ठ मंडळींची नातवंडांच्या जडणघडणीतील निर्णायक भूमिका याबाबत उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचे पाय धुवून ,त्यावर हळदीकुंकू वाहून आणि फुले वाहून आजी-आजोबांना औक्षण करून त्यांना लाडू भरवत त्यांचे नम्रतापूर्वक दर्शन घेतले. हे आजी आजोबा आणि नातवंडांचे प्रेम वाढवणारे भावनिक आणि संवेदनशील वातावरण पाहून आजी आजोबा भारावून गेले. लहान लहान लेकरांच्या हाती पूजेचे ताट पाहून प्रत्येक आजी आजोबा भावनिक होऊन मुलांना भरभरून आशीर्वाद देत होते. त्यानंतर उपस्थित सर्व महिलांच्या आणि पुरुष वर्गांच्याही संगीत खुर्चीच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
वय आणि वयानुसार होणारे गुडघेदुखी किंवा इतर त्रास विसरून या सर्व आजी-आजोबांनी मोठ्या उत्साहाने संगीत खुर्चीच्या स्पर्धेत भाग घेतला आणि बालपण पुन्हा एकदा अनुभवले. आपल्या आजी आजोबांना संगीत खुर्चीमध्ये धावताना पाहून नातवंडेही जोरजोरात टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देत होते.
शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे तसेच सहशिक्षक किरण जोगदंड हे दोघेही उपस्थित सर्व आजी आजोबांना भरपूर प्रोत्साहन देत होते. आणि त्यांचे मनमोकळेपणाने कौतुकही करत होते. यावेळी झालेल्या संगीत खुर्चीच्या स्पर्धेत महिला वर्गातून नंदाबाई पाटील- प्रथम, संजीवनी कोकाटे- द्वितीय, शरीफा सय्यद- तृतीय क्रमांक पटकावला. तर पुरुष मंडळी मधून हरिभाऊ कोकरे -प्रथम, देविदास काकडे -द्वितीय, त्रिंबक गुळवे -तृतीय असे क्रमांक पटकावले.
वयामुळे आणि गुडघेदुखीच्या त्रासामुळे व्यवस्थित चालता येत नाही पण तरीही शाळेने आम्हाला पुन्हा एकदा आमचे बालपण जगण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आणि आम्ही आमचे बालपण पुन्हा एकदा मनमुरांतपणे उपभोगू शकलो असे मत यावेळी संगीत खुर्ची स्पर्धेचे विजेते हरिभाऊ कोकरे यांनी व्यक्त केले.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक औदुंबर मोरे यांच्या वतीने बाळासाहेब बोडखे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच औदुंबर मोरे व गणेश कोकाटे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना आणि उपस्थित आजी-आजोबांना बिस्किट आणि चॉकलेट्स उपलब्ध करून देण्यात आले. तर शाळेच्या वतीने सर्वांना लाडू वाटप करण्यात आले.
हा उपक्रम प्रभावी रित्या राबविल्याबद्दल करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत नलावडे, तसेच वीर साहेब आणि केंद्रप्रमुख महावीर गोरे , सरपंच अविनाश मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष झेंडे तसेच सर्व ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे व सहशिक्षक किरण जोगदंड यांचे भरभरून कौतुक केले.