मद्यपी कर्मचाऱ्यांची गय नाही ; दारु पिऊन शाळेत आलेल्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई
करमाळा – नानासाहेब घोलप
जिल्हा परिषद शिक्षक असतानाही शाळेवर सतत दारू पिऊन गेल्यामुळे गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून एका शिक्षकाला निलंबित केल्याचा प्रकार करमाळा तालुक्यात घडला आहे. सदरची कारवाई करमाळा शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. तर गट विकास अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करून इतर डामडौल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धक्का दिला आहे. अशा प्रकारे कोणाचीही गयी केली जाणार नाही अशा सज्जड इशाराच गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिला आहे.
करमाळा तालुक्यातील नाळे वस्ती येथे कार्यरत असलेले शिक्षक बऱ्याच कालावधीपासून शाळेवर दारू पिऊन येतात याबाबत अनेकदा तक्रारी झाल्या. त्या संदर्भात गटशिक्षणाधिकारी श्री. पाटील यांनी यापूर्वीही सूचना देऊन कारवाईचा इशारा दिला होता. परंतु संबंधित शिक्षकांमध्ये कोणताही बदल होताना दिसला नाही. पुन्हा त्याने शाळेवर दारू पिऊन येऊन गोंधळ घातला अशी तक्रार गावकऱ्यांनी केल्यानंतर अखेर गटशिक्षणाधिकारी यांच्या शिफारसी नंतर गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सदरची निलंबनाची कारवाई केली आहे.
त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई झाल्यानंतर इतर आणखी काही कर्मचारी आपल्या रडारवर असल्याचे गटविकास अधिकारी राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्यात सुधारणा झाली नाही तर त्यांच्यावरही कारवाईचा केली जाईल असा इशारा यावेळी राऊत यांनी दिला आहे.