बंद पडणाऱ्या एस टी बस बाबत मोहिते पाटील अधिवेशनात लक्ष वेधणार ; नव्या गाड्यांसाठी प्रयत्न
करमाळा समाचार
करमाळा तालुका व परिसरातील एसटी बस बंद पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या संदर्भात अनेकदा सोशल मीडियामध्ये आवाज पोहोचवण्याचे काम युवकांच्या माध्यमातून करण्यात आले. तर काही दिवसांपूर्वी राजकीय नेत्यांनीही निवेदन देऊन संदर्भात पाठपुरावा केला आहे. यासंदर्भात विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व इतर सहकारी राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये अद्यावत बस उपलब्ध करून देणे बाबत उद्या प्रश्न उपस्थित करणार आहेत.

राज्यातील विविध आगारात वापरुन झालेल्या बस याठिकाणी देण्यात आलेल्या असल्याने त्या प्रवासादरम्यान रस्त्यावर बंद पडत आहेत. याचा नाहक त्रास जेष्ठ नागरीक, रुग्ण, लहान मुले, महिला, विद्यार्थी यांना होत आहे. करमाळा तालुक्यासह सोलापुर जिल्ह्यात अपुर्या असणार्या बसेस आणि दुरुस्ती अभावी रस्त्यात बस बंद पडत असलेच्या घटना यांचा गांर्भियाने विचार करुन जास्तीत जास्त नविन बस या आगारांना किती दिवसात उपलब्ध करून देणार व ई-बसची सेवा जिल्हा आणि तालुकास्तरावर देण्यात येणार आहे काय ? असा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केले जाणार आहे.

सध्या विविध योजनामुळे गर्दी वाढलेली आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळात मिळणे अपेक्षीत आहेत. तर करमाळा हे सोलापुर पुणे, अहमदनगर, धाराशिव या जिल्ह्यांच्या मद्यवर्ती बसस्थानक आहे. येथुन एसटीच्या २५० पेक्षा अधिक फेऱ्या होत असतात. सद्या करमाळा आगारात १०० बसची आवश्यकता असताना केवळ ६५ बस कार्यरत असून त्यातील बहुतांश बस नादुरुस्त आहेत. गेल्या १० वर्षापासुन करमाळा आगाराला एकही नवीन बस मिळालेली नाही.