पत्नी मृत, मुले सांभाळत नाहीत, दुसऱ्या लग्नाची समस्या ; ७४ वर्षीय माजी सैनिकाची तहसिलदारांसमोर व्यथा
करमाळा समाचार
एका ७४ वर्षीय माजी सैनिकाची व्यथा… ‘पत्नी मृत झाली आहे. मुले सांभाळत नाहीत. माझ्यासमोर वृद्धापकाळात आरोग्याची काळजी घेण्यासाठी सहचारिणीची उणीव आहे. दुसऱ्या लग्नाची समस्या माझ्यासमोर आहे…’ वृद्ध माजी सैनिकांच्या या समस्या ऐकून सारेच अवाक झाले. सर्व माजी सैनिकांची गाऱ्हाणे ऐकून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिले. तालुक्यातील रस्ते हद्द व तहसील संबंधित कामांशिवाय ऊस बिल व घरगुती वाद-विवाद ही यावेळी माजी सैनिकांच्या कुटुंबीयांनी मांडले होते.

करमाळा तहसीलच्या वतीने आयोजित सैनिक हो तुमच्यासाठी कार्यक्रमाचे. निवृत्त सैनिकांनी आपल्याला विविध प्रश्न मांडण्यासाठी एक दिवस राखीव द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी २९ ऑगस्ट रोजी

तहसीलमध्ये बैठक आयोजित केली. त्या बैठकीत सैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. माजी सैनिक तसेच सैनिकांच्या कुटुंबीयांनी रस्त्यांची प्रलंबित प्रकरणे, जमीन मोजणी, हद्द कायम करून घेणे, भावाने जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली, सामायिक क्षेत्राबाबतची तक्रार, याशिवाय जमिनीची मोजणी झाली नाही अशा तक्रारी तहसीलदारांसमोर मांडल्या. भोसे तालुका पंढरपूर येथील साखर कारखान्याने ऊस उचलला पण बिल अद्याप दिले नाही, अशी तक्रारही करण्यात आली.
• माजी सैनिकांचा आदर करणे, त्यांच्या सर्वच प्रश्नांकडे प्रशासकीय यंत्रणांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. माजी सैनिकांच्या जगण्यातील एकूण प्रश्नांकडे समाजशास्त्रीय अंगाने पाहायला हवे. वृद्धांचे हक्क व अधिकाराकडे मानवी दृष्टिकोनातून पाहिले जाईल. शिल्पा ठोकडे, तहसीलदार, करमाळा.