करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

आज बिबट्याने माणसाऐवजी कोल्ह्याचा फडशा पाडला ; थेट घटनास्थळावरुन पोलिस निरिक्षक पाडुळे साहेब

बिबट्याचा मुक्काम अजूनही शेटफळ दहिगाव रोडवर शेटफळ पासून एक किलोमीटर अंतरावर आहे.
– श्रीकांत पाडुळे
पोलीस निरीक्षक
करमाळा पोलीस ठाणे

▪️आज संध्याकाळी ०५.०० वाजता बिबट्याच्या पायाचे ठसे शेटफळकडून दहिगावकडे जाताना मिळाले. त्यानंतर आज रात्री तो मुक्कामाला दहिगाव व वांगी नंबर २ शिवारात जाईल असे वाटत होते, परंतु ज्या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे मिळून आले, त्याठिकाणी रात्री ०७.३० ते ०९.४५ वाजेपर्यंत वनखात्याचे अधिकारी, शार्प शूटर व रेस्क्यू टीम सोबत आम्ही पोलिसांनी अंतर्गत भागात केळी व उसाच्या पिकांमध्ये तीन टीम बनवून सर्च ऑपरेशन केले.

दरम्यान रात्री ०८.३० वाजण्याच्या सुमाराला दोन कोल्हे आत गेलेले एका टीमला दिसले व कोल्हे ज्या दिशेने गेले त्या दिशेला दहा मिनिटांमध्ये एका कोल्ह्याचा मरताना ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्याच्या सोबत असलेला जिवंत कोल्हा पाच मिनिटात बाहेर पळत येताना दुसऱ्या टीमला दिसला. म्हणून आम्ही पुन्हा फिल्डिंग सतर्क केली. दाट अंधारात ऊसात व केळीत जाऊन एका टीमने सर्च घेतला परंतु ज्या दिशेला आवाज आला त्या दिशेला काहीही मिळून आले नाही. यावरून बिबट्याने कोल्ह्याची शिकार केल्यानंतर ती दुसऱ्या दिशेला घेऊन गेला असावा असे वाटते.

ज्या पूर्व बाजूला शेतातील नाल्यातून पाणी वाहत होते त्या बाजूला शिकार केल्यानंतर बिबट्या पाणी प्यायला येईल म्हणून फिल्डींग लावली होती. त्या बाजूला तासाभरानंतरही तो आला नाही. यावरून त्याने कोल्ह्याची शिकार केलेली जागा सोडली असावी याची खात्री झाली त्यामुळे आम्ही सर्च ऑपरेशन बंद केले.

आज सर्व नागरिक सतर्क राहिल्याने या नरभक्षक बिबट्याला मनुष्याची शिकार करायला मिळाली नसल्याने त्याने कोल्ह्यावर आजची भूक भागवली असावी. परंतु उद्या तो कोल्ह्या-कुत्र्यावरच थांबेल असे गृहीत धरता येणार नाही. तरी सर्व नागरिकांनी यापुढे अत्यंत सतर्क रहावे, ही विनंती.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE