सोबत घेऊन विरोधात प्रचार करीत शिंदे गटाला “गोळीगत धोका” ? ; मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस यांच्या भुमिकेकडे लक्ष
करमाळ समाचार
विधानसभेची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर करून माजी आमदार नारायण पाटील यांचे नाव पुढे केले. त्यामुळे महाविकास आघाडीतून दुसरे नाव पुढे येऊ शकले नाही. पण अंतिम क्षणापर्यंत महायुतीकडून उमेदवार ठरण्यास उशीर झाला होता. सुरुवातीपासून अपक्ष लढणार ही भूमिका घेऊन गाव भेट दौरे सुरू केलेल्या दिग्विजय बागल यांच्या गळ्यात अखेर महायुतीची माळ पडली. पण महायुती मित्र पक्षांकडून मात्र बागल यांना धक्क्यावर धक्के देत असल्याचे दिसून येत आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या ऐवजी गटातटाच्या राजकारणाला अधिक महत्त्व राहिलेले आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यात मातब्बर असलेल्या पाटील, जगताप व बागल गटाची कायमच सरशी राहिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष त्यांना आपल्या बाजूने खेचून घेण्याचा प्रयत्न करतो. बागल यांनी यांना अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. पण महायुतीला तालुक्यात उमेदवार मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर महायुतीने आपली संपूर्ण ताकद ही दिग्विजय बागल यांच्या मागे ठेवत त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.
रश्मी बागल या भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष काम पाहत असतानाही करमाळा तालुक्यातील जागा शिवसेनेला सुटत असल्याने दिग्विजय बागल यांना करमाळ्यात शिवसेनेच्या जागेवर उभा करण्यात आले. त्यानंतर मात्र सुरुवातीला भाजपाचा एक गट नाराज होत विरोधी गटात जाऊन सहभागी झाला. त्यानंतर स्वतः मित्र पक्षाचे प्रमुख नेते अजित दादा पवार यांनीच अपक्ष उमेदवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे बागलांना सोबत घेत मित्र पक्षांकडून “गोळीगत धोका” दिला जातोय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुळातच बागल हे कोणत्या पक्षाच्या आधारापेक्षा स्वतःच्या हिमतीवर व गटावर काम करताना दिसून येतात. त्यातच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेल्या ताकदीमुळे बागल गट पुन्हा एकदा उभा राहिला व शिवसेनेच्या माध्यमातून आता मैदानात उभा आहे. शिवसेना व भाजपाचे प्रमुख नेते सोबत असल्याने आजही बागल लढा देताना दिसत आहेत. पण महायुतीच्या मित्र पक्षात सर्वकाही आलबेल दिसत असले तरी करमाळा तालुक्यात मात्र युतीमध्ये फुट पडल्याचे दिसून येत आहे. याचा फटका महायुतीला बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.