जिल्हास्तरीय सैनिक कुटुंबीय संरक्षण समितीमधे करमाळ्याचे ऑनररी कॅप्टन अक्रूर शिंदे यांची निवड
करमाळा समाचार
सोलापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांचे मार्फत सोलापूर जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक आणि सैनिकांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समिती गठीत करण्यात आली आहे. या समिती मध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून विशेष कार्य करणाऱ्या सैनिकाची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. करमाळा तालुक्यातून सैनिक संघटनेसाठी विशेष कार्य करणारे तालुका अध्यक्ष मा. ऑनररी कॅप्टन अक्रूर शिंदे तसेच मा. नायब सुभेदार बाळासाहेब बोलभट यांची या समितीचे सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

या समितीमुळे सैनिकांचे व त्यांचे कुटुंबियांचे शासकीय , प्रशासकीय पातळीवरील व संबंधीत तत्सम प्रलंबित प्रश्न तसेच सामाजिक स्तरावरील अन्य समस्या सोडविण्यासाठी मदत होणार आहे . ही समिती सैनिकांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहणार असल्याचे ऑनररी कॅप्टन अक्रूर शिंदे यांनी सांगितले आहे.

सैनिक कुटुंबीय जिल्हा सरंक्षण समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल करमाळा तालुका आजी माजी सैनिक कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष ऑनररी कॅप्टन अक्रूर शिंदे यांचे तालुक्यातील विविध मान्यवर,सर्व सैनिक व कुंभेज ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.