राजकीय विश्लेषण – नगरपरिषद निवडणुकीत युतीच्या दोन गटा विरोधात सावंत गट ; तिरंगी लढत अटळ
करमाळा समाचार – विशाल घोलप

मागील नगरपरिषद निवडणुका नंतर आताच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बदल झालेले तर आहेत. शिवाय मागील विधानसभेला जे चित्र होतं त्यातही युत्या आघाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेला दिसून येत आहे. तर भाजपा व युतीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश झाल्यानंतर आता युतीचेच घटक पक्ष एकमेकांसमोर तर त्यांच्या विरोधात सावंत गट असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहे. याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर होण्याची दाट शक्यता आहे.

मागील नगरपरिषदा निवडणुकांमध्ये जगताप व बागल गटाने एकत्र निवडणूक लढवली खरी पण दोन्ही गटात फूट पडल्यानंतर तत्कालीन संजय मामा शिंदे समर्थक सावंत यांनी जगताप यांची साथ दिली होती. त्यानंतर पाच वर्षाचा काळ लोटला नगरपरिषदेवर प्रशासक लागू झाले. दरम्यानच्या काळात संजय मामा शिंदे यांच्या पासून दूर होऊन सावंत गट व जयवंतराव जगताप गट यांनी विद्यमान आमदार नारायण पाटील यांची साथ दिली व त्यांच्या जिंकण्यात मोठी भूमिका बजावली. त्यामुळे ते दोघे एकत्रच राहतील अशी चर्चा होती. परंतु ती चर्चाही आता संपली आहे.
सध्या सावंत गट हा नगराध्यक्ष पदावरून निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. तर माजी आमदार जयवंतराव जगताप हे शिवसेनेकडुन (शिंदे गट) स्वतंत्र पॅनल उभा करीत आहेत, यामध्ये जगताप हे सध्या शिवसेनेत आहेत तर बागल हे भाजपामध्ये त्यामुळे सावंत वगळता हे दोन्हीही गट हे युती सरकारमध्ये असल्याचे दिसून येते. त्यामुळे युतीतील दोन पक्षाच्या विरोधी सावंत गट असा सध्या तिरंगी लढतीचा सामना करमाळ्यात रंगण्याची शक्यता आहे. यामध्ये माजी आमदार संजयमामा शिंदे हे बागल यांच्यासह भाजपाशी जुळवून घेत राष्ट्रवादी च्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेचे महेश चिवटे व माजी आमदार जयवंतराव जगताप एकत्र दिसतील.

सदर निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी सध्या तरी उघडपणे भूमिका जाहीर केली नसली तरी जगताप व सावंत यांचे मनोमिलन करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. जरी असे घडले नाही तरी एक मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी बघायला मिळू शकते, अशा वेळी पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे. तर दिग्विजय बागल हे शिवसेना शिंदे गटाचे काम करत असले तरी या निवडणुकीत रश्मी बागल (भाजप), संजय मामा शिंदे (राष्ट्रवादी) व दिग्विजय बागल (शिवसेना) म्हणून एकत्र येतील का ? दिग्विजय बागल स्वतंत्र लढणाऱ्या शिंदे गटासोबत राहतील किंवा अलिप्त राहतील यावरही चर्चा सुरू आहेत.

