उजनी धरणग्रस्तांच्या पाणीहक्कासाठी ५ ऑक्टोबरला आंदोलन
करमाळा :

उजनी धरणाच्या निर्मितीसाठी आपल्या जमिनी, घरे व वाड्या-वस्त्यांचा त्याग करणाऱ्या करमाळा तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या पाणीविषयक मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी अविनाश मारुती सरडे व इतर धरणग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उजनी धरणाच्या निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या सुपीक जमिनी व घरांचा त्याग केला. मात्र, ज्या धरणासाठी सर्वस्वाचा त्याग केला, त्याच धरणातील पाण्यासाठी धरणग्रस्तांना वारंवार प्रशासनाकडे मागणी करावी लागत असल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
उजनी धरणातील पाण्याचे नियोजन उपलब्ध पाणीसाठ्याच्या आकडेवारीपुरते मर्यादित न ठेवता पिण्याचे पाणी, शेतीची गरज, भविष्यातील पाणीटंचाई आणि धरणग्रस्तांच्या स्थानिक गरजा यांचा विचार करून शास्त्रीय पद्धतीने करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

धरणग्रस्त शेतकरी प्रतिनिधींना पाणी नियोजन प्रक्रियेत अधिकृत सहभाग देण्याबरोबरच ‘उजनी धरणग्रस्त पाणी नियोजन समिती’ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. या समितीत जलसंपदा विभागाचे अधिकारी, धरणग्रस्त शेतकरी प्रतिनिधी, जलतज्ज्ञ, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी व आवश्यकतेनुसार लोकप्रतिनिधींचा समावेश करण्याची मागणी आहे.
तसेच उजनी धरणातील उपलब्ध पाणीसाठा, विविध वापरासाठी नियोजित पाणी, राखीव पाणीसाठा आणि शिल्लक पाण्याची माहिती सार्वजनिक करावी, उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी राखीव ठेवावे आणि पाणी नियोजनाबाबत दरवर्षी धरणग्रस्त प्रतिनिधींसोबत बैठक घ्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
५ ऑक्टोबरला धरणे आंदोलन
या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कार्यकारी अभियंता, उजनी धरण/जलसंपदा विभाग यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन व शेतकरी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. यानंतरही ठोस कार्यवाही न झाल्यास मोर्चा, धरणे आंदोलन, रास्ता रोको तसेच अन्य लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
सदरचे निवेदन मा. जिल्हाधिकारी यासह मा. अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, सोलापूर. मा. कार्यकारी अभियंता, उजनी धरण/संबंधित जलसंपदा विभाग.,मा. तहसीलदार, करमाळा, मा. उपविभागीय अधिकारी, करमाळा यांना देण्यात आले. या निवेदनावर अविनाश सरडे, इन्नूस सय्यद, शंकर बोन्द्रे, अशोक घोगरे, योगेश सरडे, सागर पोरे, महेश बोराडे, भारत साळुंखे, बापूराव सरडे, विनोद चव्हाण, राजेंद्र कांबळे, संजय कदम, भीमराव कदम, अर्जुन कदम, ऍड. अजित विघ्ने, युवराज मगर, धनंजय कांबळे, सचिन आटोळे, कन्हैया कांबळे, प्रदीप पवार, धनंजय गायकवाड, संजय गायकवाड, अक्षय गायकवाड, चंद्रकांत जाधव आदींच्या सह्या आहेत.


