उजनीवरील एआय डेटा सेंटरसह चार प्रकल्पांना शेतकऱ्यांचा विरोध; नारायण आबा पाटील यांनी जलसंपदामंत्र्यांसमोर मांडल्या
करमाळा समाचार

करमाळा : उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, एआय डेटा सेंटरसह चार प्रकल्पांना शेतकऱ्यांचा विरोध असल्याची भूमिका आमदार नारायण (आबा) पाटील यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमोर मांडली. उजनी धरणग्रस्त शेतकरी आणि मच्छीमारांच्या उपजीविकेचा विचार करून हे प्रकल्प अन्य योग्य ठिकाणी हलवावेत, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन कुकडीचे रब्बी आवर्तन, मांगी तलावात पाणी सोडणे आणि दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्यासाठीही त्यांनी आग्रह धरला.

मुंबई येथील मंत्रालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातील सिंचन, पाणी नियोजन आणि रखडलेल्या सिंचन योजनांचे प्रश्न उपस्थित केले.
कुकडीचे आवर्तन वाढवा; मांगी तलावात पाणी सोडा

करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून कुकडी प्रकल्पाचे रब्बी आवर्तन सुरू करावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. जनावरांसाठी चारा व पिण्याचे पाणी तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता, कुकडीच्या आवर्तनाचे दिवस वाढवावेत आणि मांगी तलावातही कुकडीचे पाणी सोडावे, अशी मागणी त्यांनी केली.
कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक असतानाही करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तनही विचारात घ्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. यासंदर्भात त्यांनी शासनाकडे लेखी निवेदन सादर केले.
उजनीवरील चार प्रकल्प अन्यत्र हलविण्याची मागणी
उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, एआय डेटा सेंटर आणि अन्य प्रकल्पांमुळे धरणग्रस्त शेतकरी व मच्छीमारांच्या उपजीविकेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती आमदार पाटील यांनी व्यक्त केली. या प्रकल्पांना स्थानिक शेतकरी आणि मच्छीमारांचा विरोध असल्याचे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
विकास प्रकल्प राबविताना उजनी धरणग्रस्तांचे हित, पाण्याशी संबंधित प्रश्न आणि मच्छीमारांच्या पारंपरिक उपजीविकेचा विचार होणे आवश्यक आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी या प्रकल्पांचा उजनी धरणाऐवजी अन्य योग्य ठिकाणी विचार करावा, अशी मागणी त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली.
रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा प्रश्न उपस्थित
करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या उत्तर भागासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा प्रश्नही आमदार पाटील यांनी उपस्थित केला. निधीअभावी या योजनेच्या सर्वेक्षणाचे काम अद्याप सुरू झाले नसल्याची बाब त्यांनी जलसंपदामंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. सर्वेक्षण सुरू करून पुढील कार्यवाहीला गती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
पाण्याच्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधले
कुकडीचे रब्बी आवर्तन, मांगी तलावातील पाणीसाठा, दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन, रिटेवाडी योजनेचे रखडलेले सर्वेक्षण आणि उजनीवरील प्रस्तावित प्रकल्प या विषयांवर आमदार नारायण आबा पाटील यांनी बैठकीत भूमिका मांडली. करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या पाण्याच्या गरजांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


