करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

दादासाहेबांचा कवितासंग्रह लवकरच प्रकाशनाच्या मार्गावर, साडेतीन हजार कवितांचा टप्पा पूर्ण

करमाळा समाचार

व्यक्त होण्याचे सर्वात मोठे माध्यम म्हणजे भाषा, भाषा- बोलीभाषा च्या माध्यमातून आपल्या विचारांचे प्रकटीकरण होत असते.गेली अनेक शतके आपण पाहतो भाषा काळानुरूप समृद्ध होत गेली रोजची बोलचालीची भाषा वेगळी, साहित्याची भाषा वेगळी, मातृभाषेचे ज्ञान जन्मताच प्रत्येकास असतेच, यासाठी साक्षर -निरक्षर आपापल्या भाषेतून संवाद साधत असतात. फरक एवढाच आहे.

अक्षर – साक्षर तो स्वतःच्या व्यासंगाने साहित्यरुपाने पोहोचत असतो, परंतु निरक्षर केवळ बोली भाषेच्या माध्यमातून आपले विचार मांडत असतो.  स्वातंत्र्यपूर्व काळाचा विचार केला तर महिलांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, परंतु आपण पाहतो जात्यावरच्या ओव्या, गाणी आज देखील तेवढीच आजरामवर आहेत. लेखन परंपरा आज समृद्ध असली तरी हजारो वर्षांपासून  घडलेल्या घटना पिढ्यानपिढ्या त्यांच्या तोंडी येत गेल्या आणि कालांतराने प्राप्त परिस्थितीनुसार लिखाणामध्ये प्रवृत्त होत गेल्या.

ज्याप्रमाणे एका बिजामध्ये वटवृक्ष सामावलेला असतो त्याचप्रमाणे विचारांनी मनाच्या मंथनातून साडेतीन हजार कवितांचे लिखाण पूर्ण केले आहे. समाजाचं वास्तव जाण आणि भान यांचे यथार्थ चित्रण त्यांनी कवितेचे रूपाने शब्दबद्ध केले आहे. कविता चारोळ्या अभंग लावण्या त्याचप्रमाणे काही कवितेंना चाली देऊन त्याचे रूपांतर गाण्यांमध्येही केले आहे. यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील यांच्यावर ‘करे पाटलांचे नाव गाजतय महाराष्ट्राच्या हृदयावर !’ हे गाणे त्यांनीच लिहिले आहे.

कवितेचे भावविश्व पाहिले तर अथांग सागरा प्रमाणे आहे. प्रेम, सामाजिक अशा वेगवेगळ्या  गोष्टीवर  आपल्या भावना दादासाहेब पिसे यांनी कवितेचे रूपाने सादर केल्या आहेत.

दादासाहेब यांचे मूळ गाव अनवली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर शालेय शिक्षण गावी झाल्यानंतर आयटीआय केल्यानंतर त्यांनी पवई ठाणे येथील  लार्सन अँड ट्रूबो कंपनीमध्ये आरेखक यांत्रिकी या पदावर त्यांनी नोकरी केली. तर आज ते श्री गणेशभाऊ करे पाटील यांच्या यश कल्याणी संस्था येथे कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. पंढरपूर येथे असताना सामाजिक कार्यात आवड असल्यामुळे त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून तालुका संघटक व तालुका उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असताना अनेक समाजोपयोगी  उपक्रम राबवले.

या काळात मा. मंत्री छगनराव भुजबळ यांच्या संपर्कात ते आले व या कालावधीमध्ये त्यांनी ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून अनेक सरकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या. करमाळा येथे 27 सप्टेंबर 2017 रोजी त्यांचे मित्र रमेश नामदे यांच्या सहकार्याने ते करमाळा येथे सेवेत सामावले  विचारांची घालमेल त्यांच्या मनामध्ये अनेक दिवसापासून होती. परंतु खऱ्या अर्थाने त्याला वाट मिळाली म्हणजे वयाच्या 42 वर्षी 2019 पासून त्यांनी कविता लेखना सुरुवात केली आणि 30 मे 2019 ते 1 जून 2023 पर्यंत त्यांनी साडेतीन हजार कवितेच्या लिखाणाचा टप्पा पूर्ण केला.

पूर, दुष्काळ, शेतकरी, राजकीय, सामाजिक, शिक्षण, आई-वडील, पाऊस, पर्यावरण सद्य परिस्थितीवर भाष्य करणारे विविध विषयावर कवितेचे लेखन, त्याचबरोबर भक्ती गीते, देशभक्तीपर गीते, गौरव गीते अशा अनेक गीतांचे लेखन केले आहे. विविध संस्थेच्या माध्यमातून ऑनलाईन २५ हुन अधिक काव्यस्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. सावित्री उत्सव 2023 जिज्ञासा अकॅडमी, विचारधारा, अहमदनगर आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

लवकरच त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे..
गेली अनेक वर्षापासून ऋतुचक्र बिघडले आहे. यावर्षीचा विचार केला तर अनेक नक्षत्र कोरडी जात आहेत. शेतकरी आभाळाकडे आस लावून पाहत आहे. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कारण वरूण राजा बरसला तरच आबादी आबाद होणार आहे. प्रत्येकाच्या मनातल्या यातना त्यांनी पाऊस या कवितेचे रूपाने अगदी चपखल पणे मांडलेंल्या आहेत.

पाऊस

खूप झाला अबोला
एकदातरी हास तू
कीव येऊन पावसा
मनसोक्त बरस तू

नुसतेच तुझे येणे
नुसतेच झाकाळने
थांबवं आता वाऱ्याच्या 
संगतीने पुढे पळणे

तहाणले पशु पक्षी
सारी भेगळली धरा
कासावीस झाले जीव
धावून ये जलकरा

सरले मृग नक्षत्र
रोहिण्या कोरड्या गेल्या
एका तुझ्याच आशेवर
पेरण्याही खोळंबल्या

नको पाहुस अंत
डोळा दाटते रे पाणी
हरवून गेले सुख
हरवली आनंदी गाणी

धरणे पडली कोरडी
विहिरीने गाठला तळ
तप्त झाली धरणी
कशी सोसवेल कळ

सोड रुसवा आता
ये धावत धावत
होऊ दे चिम्ब सारे
पड अंगण शिवारात

लागू दे ओढ तुला
नको लावू तू उशीर
पाहवेना हाल जीवांचे
माझा सुटतोय धीर

दादा करितो याचना
ऐक माझी विनवणी
कर सारे पाणी पाणी
होऊ दे आबादाणी

कवी – दादासाहेब

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE