ऊसदर आणि अतिवृष्टी अनुदानासाठी करमाळ्यात शेतकऱ्यांची बैठक; आंदोलनाची दिशा ठरणार!
करमाळा :

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांप्रमाणे ऊसदर मिळावा आणि सन २०२५ मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची प्रलंबित नुकसानभरपाई तातडीने मिळावी, या मागण्यांसाठी करमाळ्यात शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृह, करमाळा (कोर्टाशेजारी) येथे ही बैठक होणार आहे.

बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांनी या बैठकीचे आयोजन केले असून, तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
बैठकीत प्रामुख्याने ऊसदर आणि अतिवृष्टी नुकसानभरपाई या दोन महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांप्रमाणे न्याय्य दर मिळावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात येणार आहे.

दुसरीकडे, २०२५ मधील अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले, लाभार्थ्यांची नावे अनुदान यादीत समाविष्ट झाली आणि नुकसानभरपाईची रक्कमही निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी बैठकीत करण्यात येणार आहे.
तहसीलदारांना निवेदन; आंदोलनाचा निर्णय होणार
या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात तहसीलदार, करमाळा यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या चर्चेतून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे. ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आणि अतिवृष्टी नुकसानभरपाई सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येणार आहे.
हा प्रश्न संपूर्ण शेतकरी वर्गाच्या हक्काचा असल्याने ऊस उत्पादक शेतकरी, अतिवृष्टीग्रस्त शेतकरी तसेच जमीन खरडून गेलेले शेतकरी यांनी कोणताही विलंब न करता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजाभाऊ कदम यांनी केले आहे.
बैठकीचे ठिकाण : जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृह, करमाळा (कोर्टाशेजारी)
वेळ : शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६, दुपारी १२ वाजता.


