करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबच्या हर्ष मंडलिकची विभागीय जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी निवड!

करमाळा समाचार :

त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब, करमाळा येथील उदयोन्मुख जिम्नॅस्टिकपटू हर्ष गोकुळ मंडलिक याने जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. त्याच्या या यशामुळे करमाळ्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने दिनांक २५ व २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सांगोला येथील तालुका क्रीडा संकुलात शालेय जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक प्रकारात हर्ष मंडलिक याने सहावा क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

हर्ष हा त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब, करमाळा येथे दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत नियमित सराव करत होता. क्लबचे मुख्य प्रशिक्षक सागर शिरस्कर सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हे यश संपादन केले. तसेच क्लबचे कोच मछिंद्र लोंढे, गोरक्ष लोंढे, साक्षी खुळे, अदिती चांदगुडे, संयुक्ता सोनके व राजलक्ष्मी सुतार यांनीही खेळाडूंच्या सरावासाठी मोलाचे योगदान दिले.

या यशाबद्दल त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबचे आधारस्तंभ वकील तथा निर्भीड पत्रकार विशाल (नाना) घोलप, ललित शिंदे (करमाळा पोलीस स्टेशन) आणि सचिन काळे (मराठा सेवा संघ, करमाळा) यांनी हर्षचे अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

क्लबच्या सचिव निशा लखन शिरस्कर, लखन शिरस्कर (पुणे ग्रामीण पोलीस, शिक्रापूर) व अतुल शिरस्कर (एसआरपीएफ पोलीस, दौंड) तसेच खजिनदार अश्विनी सागर शिरस्कर यांनीही दूरध्वनीद्वारे हर्षचे अभिनंदन केले.

या स्पर्धेच्या तयारीदरम्यान करमाळा शहरातील क्रीडा शिक्षक व प्राध्यापक रामकुमार काळे, सचिन दळवे, जितेश कांबळे, नवनाथ बोळगे व अंकुश थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबचे पालकवर्ग व हितचिंतक यांचेही सहकार्य मिळाले.

नियमित सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि जिद्दीच्या जोरावर हर्षने मिळवलेले हे यश करमाळ्यातील नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आता विभागीय स्पर्धेतही हर्षने चमकदार कामगिरी करावी, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE