डाटा सेंटर वरून शेतकऱ्यांचा संताप अनावर! पुनर्वसनातील मूलभूत सुविधांचा पत्ता नाही; नव्या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ?
मशाल मोर्चातून शेतकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनाची नांदी; अधिकारी आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक
करमाळा समाचार


उजनी धरण परिसरात प्रस्तावित डाटा सेंटरसह इतर योजनांवरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक वर्षांपासून उजनी धरणग्रस्त आणि पुनर्वसित गावांतील नागरिकांना रस्ते, वीज आणि पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. पुनर्वसनाच्या वेळी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नसताना शासनाकडून नव्या योजनांना प्राधान्य दिले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांचा सवाल असा आहे की, ज्यांच्या जमिनी, घरे आणि संसार उजनी धरणासाठी गेले, त्यांनाच आजही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असेल, तर विकासाच्या नव्या योजनांचा फायदा नेमका कोणाला होणार? ‘भीक नको, पण कुत्रा आवर’ अशी संतप्त भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी शासनाकडून नव्या प्रकल्पांची आखणी केली जात असल्याचा आरोप आंदोलकांकडून होत आहे. स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी काही राजकीय नेत्यांना सोबत घेऊन आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही शेतकरी करीत आहेत.

शेतकऱ्यांचा सवाल असा आहे की, ज्यांच्या जमिनी, घरे आणि संसार उजनी धरणासाठी गेले, त्यांनाच आजही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असेल, तर विकासाच्या नव्या योजनांचा फायदा नेमका कोणाला होणार? ‘भीक नको, पण कुत्रा आवर’ अशी संतप्त भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी शासनाकडून नव्या प्रकल्पांची आखणी केली जात असल्याचा आरोप आंदोलकांकडून होत आहे. स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी काही राजकीय नेत्यांना सोबत घेऊन आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही शेतकरी करीत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी (ता. २७ नोव्हेंबर) भीमानगर येथे काढण्यात आलेल्या मशाल मोर्चातून शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश स्पष्टपणे दिसून आला. मोर्चादरम्यान आंदोलक आणि अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात हे आंदोलन अधिक आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत.
नेत्यांच्या आश्वासनांपेक्षा शेतकऱ्यांना आता ठोस निर्णय हवा आहे. पुनर्वसित गावांतील रस्ते, वीज, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा आधी उपलब्ध करून द्याव्यात, स्थानिक शेतकरी व मच्छीमारांना विश्वासात घ्यावे आणि त्यानंतरच उजनी परिसरातील नव्या योजनांबाबत निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी होत आहे.
आता मशाल मोर्चा ही केवळ आंदोलनाची सुरुवात ठरणार की शासन शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन तोडगा काढणार, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


