भाजपा विरोधी गटाचा चेहरा म्हणून मोहिते पाटलांची प्रमुख भूमिका ; एकीकडे प्रवेशाची धडपड असताना मोहिते पाटील भूमीकेवर ठाम
करमाळा समाचार

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एक वेगळीच राजकीय परिस्थिती पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात भाजपचे राजकीय वर्चस्व असताना भाजपला आव्हान देणारी ताकद म्हणून मोहिते-पाटील गटाकडे पाहिले जात आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते व नाराजी नंतर भाजपसोबत असलेल्या मोहिते-पाटलांना पक्षाबाहेर जाण्याची वेळ आली व पुन्हा त्यांनी घरवापसी केली. आता त्यांचाच विरोध भाजपसाठी राजकीय डोकेदुखी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

निकटवर्ती किंवा पक्ष श्रेष्टींची मर्जी राखणारे नेतृत्व लादण्यासाठी किंवा मोहिते गट संपावण्याच्या हेतूने राजकीय महत्त्वाकांक्षेत पक्षाचा विस्तार करण्यापेक्षा प्रभावशाली राजकीय मित्रांना दूर करण्याची भूमिका भाजपने घेतली का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
जिल्हाभरातील राजकीय घडामोडींनी संघर्षाला नवे वळण
माढा लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा पराभव केल्यानंतर जिल्ह्यातील भाजप विरुद्ध मोहिते-पाटील संघर्ष अधिक तीव्र झाला. या संघर्षाचा परिणाम माढा, माळशिरस, सांगोला आणि करमाळा या भागांतील राजकारणावरही झाला.

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने ६८ पैकी ३९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. अकरापैकी आठ पंचायत समित्यांवरही भाजपने वर्चस्व मिळवले. त्यामुळे सत्तेच्या आकडेवारीत भाजप वरचढ असला तरी मोहिते-पाटील यांच्याशी असलेला राजकीय संघर्ष संपलेला नाही. उलट, हा संघर्ष आता जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही हे चित्र स्पष्ट झाले. भाजपप्रणीत सहकार विकास पॅनेलने १९ पैकी १० जागा बिनविरोध जिंकल्या. उर्वरित नऊ जागांसाठी मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनेलने विविध पक्षांतील नेत्यांना एकत्र आणून आव्हान उभे केले. २६ नोव्हेंबर रोजी या जागांसाठी ८६.९४ टक्के मतदान झाले.
म्हणजेच, भाजपने सत्तेच्या माध्यमातून अनेक राजकीय आघाड्यांवर यश मिळवले असले तरी मोहिते-पाटील यांनी भाजपविरोधात विविध राजकीय शक्तींना एकत्र आणण्याची क्षमता दाखवली आहे.
भाजपने जिल्ह्यात आपली ताकद वाढवताना स्थानिक प्रभावशाली नेत्यांना सोबत घेऊन जिल्ह्यात सत्ता मिळवल्या पण त्यात मुळ भाजपा पेक्षा बाहेरून आलेल्या नेत्यांचा भरणा जास्त दिसत आहे हा आता चर्चेचा विषय ठरत आहे. सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाचे सध्याचे चित्र पाहता भाजपकडे सत्ता, संघटनात्मक ताकद आणि राजकीय संख्याबळ आहे. मात्र, या सगळ्याच्या पलीकडे जनतेमध्ये राजकीय वातावरण निर्माण करण्याची आणि विविध घटकांना एका व्यासपीठावर आणण्याची क्षमता मोहिते-पाटील दाखवत आहेत.
भाजपने एकहाती वर्चस्व आणि निष्ठावंत नेते मोठे करण्याच्या नादात एकेकाळी पक्षासोबत असलेल्या प्रभावशाली मोहिते-पाटलांना दूर लोटले आणि आता त्यांच्याच विरोधाचा सामना करण्याची वेळ आली आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. सोन्याच्या हव्यासात हातातील हिरा गमावला, अशीच काहीशी अवस्था भाजपची झाली आहे का? जिल्ह्यातील सत्ता टिकवणे आणि राजकीय विरोधक संपवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, याचा अनुभव भाजपला येत आहे का, हा खरा प्रश्न आहे.
आजचा निकाल काहीही झाला तरी लढवंय्या व विरोधी गटाचा प्रमुख नेता म्हणून जिल्ह्यात मोहिते पाटलांकडे बघितले जात आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षात प्रवेशासाठी झुंबड असताना जनतेतील रोष बाहेर आणण्याचे काम मोहिते पाटील सातत्याने करताना दिसत आहेत. निवडणूकात हार जीत होत असताना लोकांचा पाठिंबा मात्र वाढताना दिसत आहे. यामुळे आगामी काळात जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व कायम राहते की मोहिते-पाटील भाजपविरोधी राजकारणाची नवी मोट बांधून राजकीय समीकरणे बदलतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


