कांदा निर्यातबंदी निर्णयाने शेतकरी संतप्त
करमाळा समाचार
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी वर्गामधून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे कांद्याचे भाव खाली येवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

कांद्याला चांगला दर मिळू लागल्याने कांदा उत्पादक सुखावले असताना सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाचा थेट परिणाम कांद्याच्या दरावर होवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चांगल्या उत्पन्नाच्या आशा मावळू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच तालुक्यातील कांदा उत्पादकांमधून निर्यात बंदी निर्णयाचा पुनर्विचार होण्याची मागणी केली जावू लागलीय.

तालुक्यातील पोटेगाव येथील बापू बिडगर यांनी कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे अनेक शेतकरी अडचणीत येणार आहेत. कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून अडचणींना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना कांदा दरामुळे दिलासा मिळत असतानाच निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांना पुन्हा अडचणीत आणणारा आहे. या निर्णयाचा पुनर्विचार केला जावा. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.