कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत ; नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करण्याची मागणी
करमाळा समाचार
कांद्याचे मार्केट चांगले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्याच्या शेतातील कांदा सततच्या पावसामुळे व हवामान बदलामुळे पूर्णपणे वाया गेलेला आहे. कांदा पिकांवरती मोठ्या प्रमाणात रोगराईचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडलेला आहे.

जिंती परिसरात कांदा पिकाचे प्लॉटची प्लॉट नष्ट झालेले आहेत. महसूल व कृषी विभागाला शेतकरी नुकसानग्रस्त कांदा पिकाच्या पंचनामे बाबत मागणी करत आहे. परंतु अद्याप पर्यंत तालुक्यांमध्ये नुकसानग्रस्त कांदा पिकाचे कोठेही पंचनामे झाले नाहीत. शेतातील उभी पिके पाहून शेतकऱ्यांचा जीव केविलवाणा होत आहे. नुकसानग्रस्त कांदा पिकाचे शासकीय पंचनामे होणार का? शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार का? बळीराजाचे आसू मायबाप सरकार पुसणार का ? असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर भेडसावत आहेत. तरी शासनाने त्वरित नुकसानग्रस्त कांदा पिकाचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी वर्गातून केली जात आहे.
लोकप्रतिनिधी व शासकीय प्रतिनिधींनी मिळून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा शासन दरबारी मांडून त्वरित पंचनामे करण्यात यावेत व विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करावी
– दिलीप दंगाणे
कांदा उत्पादक शेतकरी जिंती

नुकसानग्रस्त पिकांबाबत अद्याप पर्यंत आम्हाला वरिष्ठांचे आदेश आलेले नाहीत. आदेश मिळताच पंचनामे करू.
– विनोद सोनवणे
कृषी सहाय्यक जिंती सज्जा