कंत्राटी कर्मचारी नितीन पाटील च्या मृत्युस जबाबदार म्हणून तिघांवर गुन्हा दाखल
करमाळा समाचार
महावितरण मध्ये कार्यरत असणारा कंत्राटी कर्मचारी नितीन पाटील याच्या मृत्यूनंतर आता तिघांना जबाबदार धरत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी भाऊराव बागडे, करमाळा. अमित टोणपे कुर्डूवाडी, संतोष घरबुडे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी सकाळी अकराच्या दरम्यान कर्जत करमाळा रस्त्यावर रावगाव हद्दीत रोहित्रा चे काम करण्यासाठी गेल्यानंतर अचानक वीज पुरवठा आल्याने झालेल्या दुर्घटनेत नितीन पाटील हा मयत झाला होता. यावेळी गावकऱ्यांनी महावितरणच्या अधिकारांवर रोष व्यक्त केला. भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका सुरुवातीला घेण्यात आली. तसेच संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल न झाल्याने संतप्त जमावाने मृत शरीर ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला. अखेर रात्री उशिरा तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच खातेनिहाय ही या घटनेची चौकशी होणार आहे. त्यानंतर गावकऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.