सोलापूर जिल्हासोलापूर शहर

आमदार संजयमामा शिंदे यांचा कोरोनाकाळातील कामांचा लेखाजोखा ; विरोधकांनी वस्तुस्थिती माहीत असताना बिनबुडाचे आरोप

करमाळा समाचार 

2019- 20 मध्ये करमाळा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी झाल्यानंतर आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील आरोग्यविषयक समस्या ,तसेच उपजिल्हा रुग्णालयात सिझर विभाग सुरू करणे , दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करणे या विषयावरती 20 फेब्रुवारी 2020 रोजी मीटिंग घेतली. सदर मिटिंग मध्ये जेऊर येथील ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करणे हा एक विषय होता.

सदरील विषयाला अनुसरून मार्च 2020 मध्ये उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे, तहसीलदार समीर माने, बांधकाम विभागाचे उपअभियंता निमकर सो , वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कोळेकर यांनी सदर इमारतीची पाहणी केली. पाहणीमध्ये खालीलप्रमाणे अनेक त्रुटी आढळून आल्या.

पार्टिशन नसणे…
खिडक्यांच्या काचा तुटलेल्या असणे.
ऑपरेशन थेटरमधील स्टाईल फरशी निघून पडलेली असणे.
वीज कनेक्शन नसणे..
पाणी कनेक्शन नसणे..
सदर त्रुटी बांधकाम विभागाने तात्काळ दुरुस्त करून द्याव्यात याविषयी आ. संजयमामा शिंदे यांनी बांधकाम विभागाचे उपअभियंता निमकर सो यांना सूचना केल्या.

त्यानुसार बांधकाम विभागाने या त्रुटी पूर्ण करून सदर इमारतीचे हस्तांतरण आरोग्य विभागाकडे करावे असे ठरले. मे 2020 मध्ये बांधकाम विभागाकडून सदर कामांची पूर्तता करण्यात आली .त्यानंतर या इमारतीची पुन्हा पाहणी करण्यात आली. सर्व कामे पूर्ण आहेत हे पाहिल्यानंतर करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचेकडून जिल्हा शल्यचिकित्सक यांना रिपोर्ट दिला गेला. त्यानुसार जून 2020 मध्ये रीतसर जेऊर येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली.

यादरम्यान करमाळा तालुक्यात को वीडची पहिली लाट वेगाने पसरत होती. म्हणून त्या ठिकाणी डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानूसार …
15 सप्टेंबर 2020 रोजी जेऊर येथील ग्रामीण रुग्णालयात साठी आवश्यक असलेली ऑक्सीजन लाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्याचबरोबर त्या ठिकाणी 20 ऑक्सिजन बेड ची व्यवस्था करण्यात आली.मनुष्यबळ ( डॉक्टर , वॉर्डबॉय ,सिस्टर ) यांची नेमणूक करून कोविंड केअर सेंटर सुरू करणे प्रस्तावित होते. दरम्यान उत्तरोत्तर कोरोनाची पहिली लाट ओसरत गेली. त्यामुळे केअर सेंटर सुरू करण्याचे काम थांबले.

मार्च 2021 मध्ये पुन्हा कोरोनाची दुसरी लाट तालुक्यात आली. त्यावेळेस विद्यमान आ. संजयमामा शिंदे यांनी आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा करून सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून संबंधित रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या स्टाफ च्या लेखी ऑर्डर्स मंजूर करून घेतल्या…. जेऊर येथे 20 ऑक्सिजन बेड व 10 आयसोलेशन बेड अशी व्यवस्था करण्याचे ठरले.

18 एप्रिल 2021रोजी आ. संजयमामा शिंदे यांनी जेऊर येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन तेथे डेडिकेटेड केअर सेंटर सुरू करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींची पाहणी केली. त्यानंतर जवळपास प्रत्यक्ष केअर सेंटर सुरू करण्यासाठी तीन आठवड्याहून अधिक कालावधी लागला .यादरम्यान तालुक्याचे लोकप्रतिनिधी करमाळ्यात आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यामध्ये कमी पडत आहेत. याविषयी अनेक राजकीय नेतेमंडळींनी चर्चा सुरू केल्या .जेऊरचे सेंटर सुरू करण्यावरून राजकीय श्रेयवाद रंगला ,परंतु प्रत्यक्षात विद्यमान आमदाराचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे असाही सूर या चर्चेमध्ये होता.

प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी होती. हे राजकीय नेतेमंडळी बरोबरच, जबाबदार पत्रकार मंडळींनासुद्धा covid सेंटर सुरू करण्या पाठीमागील अडचणींची कल्पना होती. परंतु त्या अडचणींकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून सेंटर सुरू न होण्याचे खापर आमदारांच्या माथी फोडण्याचे काम सर्वच मंडळींनी केले. लोकप्रतिनिधी कमी पडले , त्यांचे वजन कमी पडले, त्यांचे दुर्लक्ष होत आहे वगैरे..

प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळी होती..

ग्रामीण रुग्णालयात केअर सेंटर सुरू करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्यानुसार 18 एप्रिल 2021 रोजी संबंधित पदांच्या थेट ऑर्डर काढल्या गेल्या. जरी ऑर्डर काढल्या गेल्या तरी त्यापैकी एकही स्टाफ ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी हजर झाला नाही. त्यामुळे सर्वच्या सर्व जागा रिक्त राहिल्या. जर हा स्टाफ हजर झाला असता तर सेंटर एप्रिलमध्येच सुरू झाले असते. केअर सेंटरसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता होऊनही केवळ मनुष्यबळ अभावी हे सेंटर सुरू करता येत नाही हे लक्षात आल्यानंतर आ. संजयमामा शिंदे यांनी पुन्हा नव्याने पदभरती साठी जाहिरात देण्याच्या सूचना दिल्या.

या पदभरतीला अनुसरून स्थानिक लोकांमधून वॉर्डबॉय आणि ब्रदर यांच्या नेमणुका केल्या गेल्या. परंतु अनुदान उपलब्ध नसल्यामुळे त्यांना नेमणुक पत्र मिळू शकले नाहीत . डॉक्टर आणि इतर स्टाफ यांची भरती मात्र दुसर्‍या पदभरती नुसार ही झाली नाही. ही अडचण सोडविण्यासाठी अखेर करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील 4 एम.बी.बी.एस डॉक्टर व इतर आवश्यक स्टाफ यांची नेमणूक तात्पुरत्या स्वरूपात जेऊर या ठिकाणी डेडिकेटेड केअर सेंटरला करावी अशी सूचना आ. संजयमामा शिंदे यांनी केली. त्यानुसार मनुष्यबळाचा प्रश्न सुटला गेला. त्यानंतर मुख्य मुद्दा पुढे आला तो म्हणजे ऑक्सिजन पुरवठ्याचा करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयाला दररोज 50 सिलेंडर ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे ,त्याचबरोबर जेऊर या ठिकाणी नव्याने सुरू होणाऱ्या डेडिकेटेड केअर सेंटरसाठी 40 सिलेंडरची आवश्यकता आहे. या दोन्ही ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित न होता वेळेवर मिळाला पाहिजे या संदर्भात टेंभुर्णी येथील रामभाऊ शिंदे या वितरकांना आ. संजयमामा शिंदे यांनी फोनवरून सूचना दिल्या.

ऑक्सीजन भरण्यासाठी आवश्यक असणाऱ्या टाक्या शासनाकडून मिळण्यास विलंब लागत होता. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते श्री. तात्यासाहेब कळसाईत यांनी 10 सिलेंडर टाक्या मोफत दिल्या. त्याचबरोबर करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. श्रेनिक खाटेर यांनी 21 सिलेंडर टाकी मोफत दिल्या .त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्याचा प्रश्नही निकाली निघाला .या दोघांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल आ. संजयमामा शिंदे यांनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

प्रत्यक्ष 12 मे 20 21 रोजी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते डेडिकेटेड कोविड केअर सेंटरचे उद्घाटन होण्याच्या दिवशीच वीज वितरण कंपनीकडून थकित वीज बिलाचा प्रश्न उपस्थित करून वीज पुरवठा जोडण्यास नकार दिला .याविषयी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांच्याशी आ. संजयमामा शिंदे यांनी चर्चा करून मा. तहसीलदारसो यांचे लेखी पत्र वीज वितरण कंपनीला दिले गेले .त्यानुसार वीज पुरवठा जोडण्यात आला आणि या प्रलंबित डेडिकेटेड केअर सेंटर चा प्रश्न मार्गी लागला..

जेऊर येथील डेडिकेटेड को विड सेंटर मध्ये सध्या 10 ऑक्सिजन बेड ची सुविधा देण्यात येत आहे. आवश्यक स्टाफची नियुक्ती केल्यानंतर आणखी नव्याने 10 ऑक्सिजन बेड या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत. सध्या 9 रुग्ण याठिकाणी ॲडमिट आहेत.

करमाळा आणि ऑक्सिजन बेडची संख्या हा प्रश्न जबाबदार पत्रकार अनेक वेळा उपस्थित करत असतात …त्यामध्ये करमाळा येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात फक्त दहा ऑक्सिजन बेड होते .परंतु ही कमी पडणारी संख्या लक्षात घेऊन आ. संजयमामा शिंदे यांनी वारंवार सूचना करून त्यामध्ये जवळपास 20 ऑक्सिजन बेडची सुविधा वाढविण्यात आलेली आहे. याकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले जाते ? हा मोठा प्रश्न आहे.

25 एप्रिल 2021 रोजी आ. संजयमामा शिंदे हे स्वतः कोरोना पॉझिटिव असतानाही करमाळा येथील ऑक्सिजन अभावी रुग्णांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात अतिरिक्त 10 ऑक्सिजन बेड सुरु करा अशा सूचना केल्या .त्यानुसार 10 ऑक्सीजन बेड तात्काळ सुरूही करण्यात आले. पुढे रुग्णांची अधिक वाढणारी संख्या लक्षात घेऊन त्यांनी पुन्हा 1 मे 2021 रोजी 10 बेड अधिक सुरू करा या स्वरूपाच्या सूचना आमदार महोदयांनी दिल्या त्यानुसार 10 ऑक्सीजन बेड सुरू करण्यात आले.

विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे सोलापूर जिल्ह्यात 30 ऑक्सीजन बेड सुरू करणारे आणि त्याची सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देणारे करमाळा उपजिल्हा रुग्णालय हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले सरकारी रुग्णालय ठरलेले आहे . त्यानंतर जिल्ह्यातील इतर रुग्णालय यामध्ये पुढे आली .परंतु पहिलेपणाचा मान हा करमाळा उपजिल्हा रुग्णालयास मिळालेला आहे. त्याकडे किमान जबाबदार पत्रकारांनी दुर्लक्ष करू नये एवढी अपेक्षा आहे.

करमाळा आणि त्या ठिकाणी ऑक्सिजन बेडची वानवा, इंजेक्शनचा अपुरा पुरवठा, ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा, आरोग्य सुविधेचा अभाव या समस्या आपल्या तालुक्यामध्ये असून शेजारचे तालुके मात्र या बाबतीमध्ये अग्रेसर आहेत हे ठळकपणे मांडले जाते .अर्थात हा तालुक्याचा बॅकलॉग हा वर्ष – दोन वर्षाचा असू शकत नाही .एखाद्या तालुक्यामध्ये चांगली आरोग्य सुविधा, खाजगी व सरकारी अद्ययावत रुग्णालय उभा राहणे , शिक्षण संस्था उभ्या राहणे ,लोकांचा जीवनमानाचा स्तर उंचावणे, उद्योगधंद्यांची भरभराट होणे यासाठी किमान वीस – पंचवीस वर्षे अगोदर त्याची पायाभरणी झालेली असते. त्यानंतर या सुविधा त्या भागांमध्ये चांगल्या पद्धतीने मिळताना आपल्याला दिसून येतात. बार्शी सारख्या शहरांमध्ये आज चांगल्या आरोग्य सुविधा मिळत आहेत .परंतु गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून त्या ठिकाणी या पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या गेल्या.

त्यामुळे त्या ठिकाणी चांगल्या आरोग्य सुविधा सर्वांना मिळत आहे.याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. करमाळा तालुक्यामध्ये वीस – पंचवीस वर्षापासून चा हा तालुक्याचा बॅक लॉक भरायचा राहून गेल्यामुळे आज तालुक्यामध्ये चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध नाही याचे खापर आपण विद्यमान लोकप्रतिनिधीवरती फोडू शकत नाही , हे अगोदरच्या लोकप्रतिनिधींचे अपयश आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल. करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नाही अशी चुकीची माहिती प्रसारित केली जाते. वस्तुस्थिती अशी आहे की उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. परंतु ते वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या फिजिशियन ची नियुक्ती अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. ती झालेली नसल्या कारणामुळे व्हेंटिलेटर असूनही त्याचा वापर रुग्णांसाठी करता येत नाही ही मर्यादा आहे .आज पर्यंत जेवढे ही कोरोना रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट झालेले आहेत आणि ज्यांना इंजेक्शनची आवश्यकता आहे अशा प्रत्येक रुग्णाला इंजेक्शन उपलब्ध करून दिलेली आहे व भविष्यातही त्यांना ते विनासायास मिळणार आहेत*….

त्यामुळे जे बोलणार ते तोलणारच… अशी ख्याती आमदार संजयमामा शिंदे यांची असून लोकांचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. फक्त बेजबाबदार राज्यकर्ते मंडळींनी अशा कठीण प्रसंगी राजकारण न करता , बिनबुडाचे आरोप न करता आपल्या परीने आपले योगदान देण्याचा प्रयत्न करावा एवढीच माफक अपेक्षा आहे…

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE