मकाईच्या बीलासाठी पुढचे पाऊल कोणते यासाठी बैठक सुरु ; शेतकरी आक्रमक
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत बिलासाठी वारंवार आंदोलने करून निर्णय होत नसेल तर आता कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. सदरची मागणी ही करमाळा येथे सुरू असलेल्या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. तर प्राध्यापक झोळ यांच्या वतीने तक्रार देऊन गुन्हा दाखल करू असे बैठकीत ठरले आहे. त्याशिवाय सामूहिक आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला आहे. सध्या मौलाली माळ येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक सुरू आहे.

सदर बैठकीचे नियोजन प्राध्यापक रामदास झोळ, शेतकरी कामगार पक्षाचे नेते दशरथ कांबळे, एडवोकेट राहुल सावंत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र गोडगे यांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर बैठकीला मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव उपस्थित आहेत.

मागील महिन्यात आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत भेट घेऊन 25 तारखेपर्यंत ची मुदत दिली होती. त्यानंतर पुढे काय हे ठरवण्यासाठी सध्याची बैठक सुरू आहे. मान्यवर उपस्थित लोकांची मते जाणून घेत आहेत व कशा पद्धतीने पुढचे आंदोलन करायचे हे ठरवले जात आहे. तर उपस्थित लोकांमधून संबंधितांवर गुन्हे दाखल करा, पाहिजे ते करा आम्ही तुमच्या सोबत आहोत असा पाठिंबा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहे. तर पुढे काय भूमिका घेतायत याकडे लक्ष लागून राहिले आहे.