मोहिते सोबत आल्याने महाविकास आघाडीला अच्छेदिन ; महायुतीकडुन सावध भुमिका – वातावरण शांत
करमाळा समाचार – विशाल घोलप
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू आहे. सोशल माध्यमांमधून आपापल्या नेत्याचं कौतुक करून संपूर्ण मोबाईल हँग होईपर्यंत प्रचार यंत्रणा जोरात काम करत आहे. तर नेते मंडळी वैयक्तिक गाठीभेटीवर भर देत गावो गावी प्रचार यंत्रणा राबवत आहेत. त्यातच तालुक्यातील प्रमुख नेत्यांची विभागणी झाल्यामुळे आता या निवडणुकीत खरा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कोणासाठी प्रतिष्ठेची तर कोणाला नवसंजीवनी देणारी ही निवडणूक असेल हे नक्की.
जिल्ह्यातील कट्टर स्पर्धक मानले जात असलेले शिंदे व मोहिते पाटील पुन्हा एकदा या निवडणुकीच्या माध्यमातून समोरासमोर आले आहे. पण ज्या पद्धतीने मोहिते पाटलांनी गेल्यावेळी खुले आव्हान शिंदे यांना दिले होते. त्या तुलनेने मात्र शिंदे यांनी पलटवार केलेला दिसून येत नाही. तशी त्यांची पद्धत ही नाही अगदी शांतपणे वातावरण हाताळण्याची शिंदे यांची पद्धत असली तरी कार्यकर्त्यांना मात्र वातावरणातील गर्मी लागत असते जशी गर्मी सध्या करमाळा मतदारसंघात दिसून येत नाही. अतिशय शांतपणे मतदान प्रचार यंत्रणा सुरू आहे. त्यामुळे जरी शिंदे मोहिते एकमेकाचे विरोधक असले तरी सध्या तरी मोहिते विरुद्ध निंबाळकर असे चित्र दिसून येत आहे.
मागील अनुभव पाहता प्रमुख नेते एकत्र आल्यानंतर जनतेत वेगळा संदेश पोहोचतो व त्या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता राहते. यामुळे सध्या निंबाळकर यांनी सावध पावले उचलत रश्मी बागल व आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह माजी आमदार जयवंतराव जगताप सर्वांना एकत्र आणण्यापेक्षा स्वतंत्र बैठका आणि नियोजन केलेले दिसतेय. पण त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जे मनोमिलन अपेक्षित आहे ते होताना दिसत नाही. त्यातच प्रमुख पक्ष देखील विधानसभेला विभागले जाण्याची शक्यता कार्यकर्त्याना वाटतेय त्यामुळे लोकसभेपुरते आता पाहू आणि विधानसभेचे नंतर बघू अशी परिस्थिती सध्या मतदार संघातील प्रमुख नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. त्याशिवाय विधानसभेत आम्ही आहोत लोकसभेचे बोलु नका असेही कार्यकर्ते बोलु लागले आहेत.
तर मोहिते पाटलांनी घेतलेल्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीला अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे. शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटी नंतर शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडे तालुका पातळीवर दावा करू शकेल असा एकही मोठा नेता नव्हता. दुसऱ्या फळीतील नेत्यांनी गटाला सावरले मात्र तितकेसे बळ दिसून येत नव्हते. पण मोहिते पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना माजी आमदार नारायण पाटील यांची साथ मिळाली व यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा एकदा चांगले दिवस तालुक्यात दिसून येऊ लागले. याचा प्रभाव येणाऱ्या निवडणुकीवर पडेल असे दिसून येत आहे.