करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आवर्तन मार्गावरील गावांची उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती ; बारामती पॅटर्न वापरल्यास कायमचा टॅंकर मुक्तीचा पर्याय

करमाळाविशाल घोलप 

 

उन्हाळा आला की तालुक्यातील ३० ते ३५ गावांना पाणीपुरवठ्याची गरज भासू लागते. त्यामुळे परिसरात टँकर पुरवावे लागतात. यातून प्रशासनावर मोठा प्रमाणावर ताण पडतो. तर पाणी उपलब्ध नसेल तर अडचणी वाढतात. यातून कायमची सुटका करण्यासाठी परिसरातच पाणी साठवण्यासाठी पाण्याची टाकी (बॅलंस टॅंक) उपलब्ध करणे गरजेचे आहे. टॅंकर सुरु असलेल्या १४ गावांना दहिगाव येथील आवर्तनातून पाणी मिळू शकते व ते साठवले तर कायमची दुष्काळमुक्त होत असल्याने याचे नियोजन गरजेचे आहे. यातून सदरची गावे कायमची टॅंकर मुक्त होतील.

दहिगाव उपसा सिंचन योजनेतून वर्षाला तीन ते चार वेळा आवर्तन सोडली जातात. या आवर्तनातील जवळपास २९ गावांना याचा लाभ मिळतो. पण त्या २९ गावांपैकी १४ गावे प्रत्येक उन्हाळ्यात व दुष्काळी परिस्थितीत कायम पिण्याच्या पाण्यासाठी तरसत असतात. या १४ ही गावात सध्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. त्या गावांना जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतुन टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यावेळी आवर्तने सुरू असतात त्यावेळी संबंधित चौदाही गावांमध्ये पाणी साठवण्यासाठी योजना राबवल्यास सदरचा त्रास कायमस्वरूपी थांबणार आहे.

त्यासाठी गावात जवळपास अडीच ते पाच कोटी लिटर चा एक टॅंक बांधणे गरजेचे असून यासंदर्भात जल जीवन मिशन अंतर्गत मागणी केली जाऊ शकते. असे झाल्यास गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. त्यामुळे टँकर साठी कोणताही दबाव प्रशासनावर येणार नाही. शिवाय कसल्याही प्रकारचा दुष्काळ असेल तर पाहण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. सदरचे टॅंक मधील पाणी जवळपास शंभर दिवस संपूर्ण गावाला पुरेल इतके उपलब्ध असणार आहे. त्यामुळे केवळ या योजनेसाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे जलजीवन मिशन अंतर्गत आतापर्यंतच्या कामांमध्ये विहीर, पाईपलाईन व घरोघरी नळ हे उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये केवळ पाण्याची टाकी उपलब्ध झाल्यास संबंधित गावांचा कायमचा प्रश्न मार्गी लागू शकतो.

दहिगाव योजने अंतर्गत टॅंकर सुरु असलेली गावे …
दहिगाव योजनेअंतर्गत तब्बल २९ गावांना पाणीपुरवठा केला जातो. वर्षातून तीन ते चार वेळा सदरचे आवर्तन सोडले जाते. याच्या माध्यमातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी सोय केली जाते. तर याच भागातील निंभोरे, घोटी, वरकुटे, साडे, पाथुर्डी, मलवडी, आळसुंदे, नेरले, वरकटणे, सरपडोह, गुरसडी, सौदे, शेलगाव, फिसरे या गावांना पिण्याचे पाणी नसल्याने येथे टँकर सुरू करण्यात आले आहेत.

बारामतीत ५ कोटी लिटरचे १३ मंजुर …
सदरच्या प्रत्येक गावामध्ये वाढीव लोकसंख्येचा विचार करता ३ हजार व्यक्तींसाठी ४० लिटर प्रति मानसी विचार केला असता एक कोटी २० लाख लिटर इतक्या पाण्याची गरज लागू शकते. तर त्यासाठी अडीच ते पाच लाख लिटरचा बॅलंस टँक बांधल्यास याचे पाणी दहिगाव योजनेतून साठवले तर तब्बल १०० दिवस हे पाणी वापरता येईल. त्यामुळे कितीही मोठा दुष्काळ पडला तरी गावांना टँकर किंवा भटकंतीची गरज पडणार नाही. सदर योजना बारामती भागात कार्यान्वित करण्यात आली असून त्या ठिकाणी आतापर्यंत १३ गावात पाच कोटी लिटरच्या बॅलंस टॅंकला मंजुरी दिली आहे.

लागणारी जमीन व येणारा खर्च…
टँकर साठी प्रत्येक उन्हाळ्यात पाच ते सात लाख रुपयांचा खर्च एका गावात होत असतो. त्या बदल्यात जर बॅलंस टँक उपलब्ध झाला तर गावातील केवळ अडीच एकर जमिनीमध्ये आठ कोटी रुपये खर्च करून सदरचा बॅलंस टँक उपलब्ध केला जाऊ शकतो. गावाच्या लोकसंख्येच्या मानाने सदरची जमीन तसेच येणारा खर्च कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे शंभर दिवसांचा प्रति मानसी खर्च पाहून यातील खर्च उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केल्यास महाराष्ट्र शासन जलजीवन मिशन अंतर्गत सदरची कामे केली जाऊ शकतात.

सदर १४ गावे ही सतत टँकर ग्रस्त असणारी गाव आहेत. यामध्ये सर्व गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनचे काम झालेले आहेत. पण या गावांना कायमचा पाण्याचा सोर्स उपलब्ध नाही. यागावात बॅलन्स टॅंक उपलब्ध केले तर दहिगाव उपसा योजना व जेऊर प्रादेशीक योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पाण्यावर या गावांमध्ये परमनंट पाण्याचा सोर्स तयार होईल. टंचाई काळात याचे पाणी वापरून गावाला पाण्याचा पुरवठा होईल आणि ही १४ गावे कायमस्वरूपी टँकर मुक्त होऊ शकतात.
मनोज राऊत, गटविकास अधिकारी, करमाळा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE