जगताप गट मेळाव्यात शंभुराजेंना सल्ला तर गृहित धरणाऱ्यांना इशारा
करमाळा समाचार
करमाळा शहरात जगताप गटाचा विचार विनिमय करण्यासाठी मेळावा संपन्न झाला. यावेळी विधानसभेच्या दृष्टीने काय पावले उचलली पाहिजेत याबाबत विचारांची देवाण-घेवाण झाली. उपस्थितांमधून विधानसभा स्वतंत्र स्वबळावर लढवणे याशिवाय शंभूराजे यांना विधानसभेसाठी उभा करणे असे पर्याय सुचवण्यात आले. यावर मात्र माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी भूमिका स्पष्ट करत कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, तुम्हाला पटेल असाच निर्णय आपण घेऊ, मी घेतलेल्या निर्णयात कोणतीही अडचण राहणार नाही, त्या निर्णयामुळे तुमची ससेहोलपालट होणार नाही, तुमची कामे होतील, तुम्हाला कोण बाजूला सारणार नाही असाच आपण निर्णय घेऊ फक्त मी घेतलेल्या निर्णयावर मागे ठाम उभे रहा असे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी करमाळा येथे बोलताना केले.

यामधून माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आजही येणाऱ्या काळातील भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे जगताप गटाला कोणीही गृहीत धरू नये असा इशारा यावेळी त्यांच्या बोलण्यातून दिला गेल्याचे दिसून आले. त्यामुळे मागील वेळी ते ज्यांच्या सोबत होते त्यांच्यासोबतच असतील का किंवा नवीन पर्याय निवडू शकतात. त्यामध्ये स्वतः उभा राहणे दुसऱ्याला पाठिंबा देणे किंवा आहे तिथेच राहणे असे पर्याय असू शकतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना चिंता करू नका सांगताना विधानसभेपर्यंत शांत राहण्याचे आवाहन केले व सस्पेन्स कायम ठेवला आहे.
यावेळी युवकांमधून शंभूराजे यांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर शंभूराजांनाही जगताप यांनी गडबड करू नका. राजकारणातील धडे घ्या, लोकांची सेवा करा यामध्ये भरपूर गमतीजमती असतात तुम्ही काम करा तालुक्यातील जनता तुम्हाला योग्य वेळी योग्य संधी देईल असाही सल्ला यावेळी जगताप यांनी दिला. दरम्यान याबाबत बोलताना बागल यांच्यावरही नाव न घेता टीका केलेली दिसून आली. ते म्हणाले, तु एकटाच आहेस तुला कोणती बहीण असती तर तु पण तालुका भर वेढा मारला असता. आपण काय संस्था बंद पाडणार नाही. एकटा जरी असला तरी तू तालुक्याचा आधार झाला पाहिजे.
याशिवाय आपला गट कायम जिवंत राहणार आहे. जिवंत ठेवणार आहोत. आपला गट जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तालुक्यातील इतर गटही जिवंत राहतील असेही यावेळी जयवंतराव जगताप यांनी ठामपणे सांगितले. यावेळी व्यासपीठावर श्री. कमलाकर वीर, श्री लकडे आदी होते. तर तालुकाभरातून जगताप गटाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित झाले होते.